
अमळनेर तालुक्यात बांधकाम कामगार नोंदणीत मोठा गैरप्रकार ?
बनावट सही-शिक्क्यांच्या आधारे ९० दिवसांच्या कामाच्या प्रमाणपत्रांचा वापर; चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या लाभार्थी नोंदणी प्रक्रियेत अमळनेर तालुक्यात गंभीर गैरप्रकार होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. लाभार्थी नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या मागील १२ महिन्यांतील किमान ९० दिवस बांधकाम क्षेत्रात काम केल्याच्या प्रमाणपत्रांबाबत बनावट सही आणि शिक्क्यांचा वापर होत असल्याची तक्रार पुढे आली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कामगार संघटना, बांधकाम ठेकेदार आणि नागरिकांकडून होत आहे.
मंडळाच्या नियमांनुसार लाभार्थी नोंदणीसाठी अर्जदाराने मागील १२ महिन्यांत किमान ९० दिवस बांधकाम क्षेत्रात काम केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र संबंधित ठेकेदार किंवा विकासक, ग्रामीण भागातील कामगारांसाठी ग्रामसेवक, नगर परिषद अथवा महानगरपालिकेचे अधिकृत अधिकारी तसेच शासनाने अधिकृत केलेल्या संबंधित प्राधिकरणामार्फत दिले जाते. मात्र, काही सुविधा केंद्र चालकांकडून लाभार्थ्यांकडून हजारो रुपये घेऊन संबंधित ठेकेदारांच्या बनावट सही आणि शिक्क्यांच्या आधारे ऑनलाइन अर्ज सादर केले जात असल्याची चर्चा असून, प्रत्यक्ष पडताळणी न करता अशा प्रमाणपत्रांची नोंदणी प्रक्रियेत स्वीकार होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण नोंदणी प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित ठेकेदारांच्या नावाचा, सहीचा आणि शिक्क्याचा गैरवापर झाला असल्यास तो अत्यंत गंभीर प्रकार मानला जात आहे. अशा बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी झाल्यास शासनाची दिशाभूल होण्याबरोबरच अपात्र व्यक्तींना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता निर्माण होते. परिणामी प्रत्यक्ष बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या पात्र कामगारांच्या हक्कांवर गदा येऊन त्यांच्यावर अन्याय होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संशयास्पद अर्जांची फेरपडताळणी करून संबंधित ठेकेदारांच्या सही आणि शिक्क्यांची खातरजमा करावी, ऑनलाइन अर्ज अपलोड करणाऱ्या सुविधा केंद्रांची चौकशी करावी तसेच गैरप्रकार आढळल्यास संबंधित सुविधा केंद्र चालक, मध्यस्थ आणि इतर जबाबदार व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता संबंधित शासकीय यंत्रणेकडून होणाऱ्या अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार असून, चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करून नोंदणी प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी
“मी एक शासकीय नोंदणीकृत बांधकाम ठेकेदार असून, माझ्या नावाचे लेटरहेड, शिक्का किंवा स्वाक्षरीचा कोणालाही वापर करण्याची कोणतीही परवानगी दिलेली नाही. माझ्या नावाचा अथवा कागदपत्रांचा वापर करून कोणत्याही व्यक्तीसाठी अनुभव प्रमाणपत्र किंवा इतर कागदपत्रे तयार करण्यात आली असतील, तर तो अत्यंत गंभीर प्रकार आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे. दोषी व्यक्ती, मध्यस्थ किंवा संबंधित सुविधा केंद्र चालक आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशा गैरप्रकारांमुळे शासनाची फसवणूक होण्याबरोबरच खऱ्या व पात्र बांधकाम कामगारांच्या हक्कांवरही गदा येते. त्यामुळे प्रत्येक अर्जाची व कागदपत्रांची पडताळणी करून दोषींना कायद्यानुसार शिक्षा व्हावी, हीच माझी अपेक्षा आहे.”
–श्रीराम चौधरी, वैष्णवी कन्स्ट्रक्शन, अमळनेर
आवश्यक ती सर्व कार्यवाही करू
“महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांबाबत तक्रार प्राप्त झाल्यास त्याची सखोल चौकशी केली जाईल. चौकशीत बनावट सही, शिक्के किंवा खोटी कागदपत्रे सादर केल्याचे आढळल्यास संबंधितांची नोंदणी रद्द करण्याबरोबरच नियमानुसार फौजदारी कारवाईसाठीही प्रस्ताव पाठविण्यात येईल. पात्र बांधकाम कामगारांनाच योजनांचा लाभ मिळावा, यासाठी विभाग कटिबद्ध असून नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येईल.”
-डॉ. राजू गुल्हाणे,सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव

Leave a Reply