धार-मारवड रस्त्यावरील शेतात भीषण आग; हॉटेलसह १६ बिघ्यांतील चारा जळून राख

भर दुपारी उसळलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची शर्थ

अमळनेर (प्रतिनिधी )शहरालगतच्या धार-मरवड मार्गावरील एका शेतात शुक्रवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. आगीची तीव्रता एवढी होती की जवळील हॉटेलपर्यंत ज्वाळा पोहोचल्या. या दुर्घटनेत सुमारे १६ बिघे क्षेत्रातील गहू, मका व जनावरांचा चारा जळून खाक झाला.

 मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी अंदाजे २ ते २:३० वाजेच्या दरम्यान हॉटेल चिन्मयच्या मागील बाजूस असलेल्या शेतातून अचानक आगीचे लोट उठू लागले. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आग काही क्षणांतच परिसरात पसरली. शेतातील वाळलेले गवत, चारा आणि काढून ठेवलेले पीक भर उन्हात वेगाने पेट घेत असल्याने परिस्थिती गंभीर बनली.

आगीच्या झळा हॉटेल परिसरापर्यंत पोहोचल्याने काही काळ घबराट निर्माण झाली. जवळील मोठी झाडेही आगीत होरपळली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले.

 घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक किरण बागुल, जालिंदर चौधरी आणि श्याम बागुल यांनी प्रशासनाशी संपर्क साधत मदतीची मागणी केली. त्यानंतर मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या सूचनेनुसार अग्निशमन विभागाकडून तातडीने तीन बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले.

 अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली,दिनेश बिऱ्हाडे, कर्मचारी फारुख शेख,जफर पठाण, सत्यम संदानशिव,  वासिम पठाण आनंदा झिम्बल, मच्छिंद्र चौधरी, भिका संदानशिव, आकाश संदानशिव, अजय बिऱ्हाडे यांनी प्रखर उन्हातही जीवाची पर्वा न करता आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. गाड्यांतील पाणी संपल्यानंतर पुन्हा पाणी भरून आणत आग घरांच्या दिशेने पसरू नये म्हणून रामवाडी बाजूकडूनही पाण्याचा मारा करण्यात आला.

 दीर्घ प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर शेतीमाल व चाऱ्याचे नुकसान झाले आहे

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *