जय योगेश्वर कॉलनीत पुण्याला गेलेल्या कुटुंबाकडे घरफोडी, ६४ हजारांचा ऐवज लांबवला

अमळनेर (प्रतिनिधी) कुटुंब पुण्याला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचा कडी-कोंडा तोडून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना ४ एप्रिल रोजी ढेकू रस्त्यावरील जययोगेश्वर कॉलनीत घडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वैशाली चंद्रकांत वाघ या १४ मार्चपासून मुलाकडे पुणे येथे गेल्या होत्या. ४ एप्रिल रोजी मुलाच्या मित्राने त्यांच्या घराचा कडी-कोंडा तुटलेला असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या दुसऱ्या मित्रांनी घरी जाऊन पाहणी केली असता कपाट उघडून घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले. ५ एप्रिल रोजी सकाळी वैशाली वाघ अमळनेर येथे आल्यानंतर घरातील कपाटाचे कुलूपही तोडलेले असल्याचे आढळून आले. चोरट्यांनी कपाटातील ३० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, १२ हजार रुपये किमतीच्या चार अंगठ्या, १० हजार रुपये किमतीचे सुमारे ३० भार चांदीचे दागिने तसेच १२ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ६४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे उघड झाले. याशिवाय घरातील तांबे, पितळ व कास्याची काही भांडी देखील चोरीला गेली आहेत. याप्रकरणी वैशाली वाघ यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलिसांना घटनास्थळी पाठवले असता परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार चोरटे दिसून आले आहेत. त्यापैकी एक जण बाहेर पहारा देत उभा होता, तर इतर चोरट्यांनी घरातील साहित्य पिशव्यांमध्ये भरून लंपास केल्याचे दिसून आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *