
जी. एस. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे एनसीसी ‘अ’ प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश
४६ पैकी ४५ विद्यार्थी उत्तीर्ण; २५ विद्यार्थ्यांना ‘अ’ श्रेणी, संदीप बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशाची परंपरा कायम

अमळनेर (प्रतिनिधी) येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित जी. एस. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) आयोजित ‘अ’ प्रमाणपत्र परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि एनसीसी विभागाच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाला या निकालातून यशस्वी पावती मिळाली आहे.
यंदाच्या परीक्षेसाठी शाळेचे एकूण ४६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २५ विद्यार्थ्यांनी ‘अ’ श्रेणी, १९ विद्यार्थ्यांनी ‘ब’ श्रेणी तर १ विद्यार्थ्याने ‘क’ श्रेणी प्राप्त करत यश मिळविले. एकूण ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेच्या निकालाची टक्केवारीही उल्लेखनीय ठरली आहे. एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीची भावना विकसित होत असते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने विशेष महत्त्व मानले जात आहे. या यशाबद्दल शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी, मुख्याध्यापक व्ही. एम. पाटील, उपमुख्याध्यापक ए. डी. भदाणे, पर्यवेक्षक एस. आर. शिंगाणे, सी. एस. सोनजे, शिक्षक प्रतिनिधी राहुल पाटील, पी. एस. काटकर तसेच मुख्य लिपिक जयश्री भालेराव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामागे एनसीसी विभाग प्रमुख संदीप बनसोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांकडून नियमित सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि परीक्षेची प्रभावी तयारी करून घेतली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे.

Leave a Reply