अंगणात खडी टाकण्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल

लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने हल्ला; सानेनगर परिसरातील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) अंगणात खडी टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान महिलेला लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात झाले. या घटनेत महिला जखमी झाली असून उपचारानंतर दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २३ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सानेनगर परिसरात घडली.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पुष्पाबाई जवाहरलाल सोनवणे यांच्या अंगणात शेजारी राहणाऱ्या अन्नपूर्णाबाई यांनी खडी टाकली होती. याबाबत पुष्पाबाई यांनी जाब विचारल्याचा राग मनात धरून दुसऱ्या दिवशी हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेच्या वेळी पुष्पाबाई या घराच्या ओट्यावर बसलेल्या असताना सीमा प्रवीण गव्हाणे (रा. रामवाडी, केशवनगर) हिने हातातील लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर, पाठीवर व पोटावर वार केले. त्यानंतर रघुनाथ बारकू खैरनार (रा. तांबेपुरा, सानेनगर), हिराबाई रमेश खैरनार (रा. सुरत), रमेश नथु खैरनार (रा. सुरत) व विनोद महादू मोरे (रा. गांधलीपुरा) यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीदरम्यान पुष्पाबाई यांचा पदर पायात अडकल्याने त्या खाली पडल्या. त्यावेळी विनोद मोरे याने हातातील लाकडी दांडक्याने त्यांच्या पाठीवर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. परिसरातील नागरिकांनी हस्तक्षेप करून जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

या प्रकरणी सीमा प्रवीण गव्हाणे, रघुनाथ बारकू खैरनार, हिराबाई रमेश खैरनार, रमेश नथु खैरनार आणि विनोद महादू मोरे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), १८९(२), १९१(२)(३), १९०, ११५(२), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *