
मुलीच्या उपचारासाठीचे हरवलेले पैसे मिळाले परत; केंद्रप्रमुखांच्या प्रामाणिकपणाने आईच्या डोळ्यात आनंदाश्रू
अमळनेर (प्रतिनिधी) मुलीच्या आजारपणासाठी कर्ज काढून नेण्यात येणारे दहा हजार रुपये व महत्त्वाची कागदपत्रे हरवल्यानंतर हवालदिल झालेल्या महिलेचा जीव केंद्रप्रमुखाच्या प्रामाणिकपणामुळे भांड्यात पडला असून, त्यांना त्यांची हरवलेली रक्कम व कागदपत्रे सुखरूप परत मिळाली. या घटनेमुळे प्रामाणिकपणाचे सुंदर उदाहरण समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील गडखांब येथील कल्पना संजय पाटील या आपल्या मुलीच्या आजारपणासाठी शिरसोली येथे जाण्यासाठी जळगाव बसने प्रवास करत होत्या. मुलीच्या उपचारासाठी त्यांनी फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून त्यातील दहा हजार रुपये सोबत घेतले होते. त्याच बसमध्ये केंद्रप्रमुख राजेंद्र पाटील हे देखील प्रवास करत होते. कल्पना पाटील या आकाशवाणी चौकात उतरल्या, तर बस पुढे जळगाव बसस्थानकात गेली. सर्व प्रवासी उतरल्यावर बस आगारात सुमारे एक तास उभी होती. दरम्यान, केंद्रप्रमुख राजेंद्र पाटील हे संभाजीनगरला जाण्यासाठी बसची वाट पाहत होते. अमळनेरहून आलेली तीच बस संभाजीनगरसाठी लागल्यानंतर ते बसमध्ये चढले असता एका सीटवर प्लास्टिकची पिशवी पडलेली दिसली. पिशवीत बँक पासबुक, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि दहा हजार रुपये रोख रक्कम आढळून आली.
राजेंद्र पाटील यांनी कागदपत्रांच्या आधारे महिलेचा मोबाईल क्रमांक शोधून त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर महिला परत आल्यानंतर त्यांना त्यांची रक्कम व कागदपत्रे प्रामाणिकपणे परत देण्यात आली. हरवलेले पैसे परत मिळाल्यानंतर महिलेच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि त्यांनी राजेंद्र पाटील यांच्या प्रामाणिकपणाबद्दल मनापासून आभार मानले. या प्रसंगी सी. के. जाधव व लीलाधर पाटील उपस्थित होते. या घटनेमुळे आजही समाजात प्रामाणिकपणा जिवंत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply