
गळवाडे रोडवरील अपघातांची मालिका; नागरिक संतप्त, आंदोलनाचा इशारा
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील गळवाडे रोड परिसरात वारंवार होत असलेल्या रस्ता अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून दाजीबा नगर येथील रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १५ मार्च २०२६ रोजी दाजीबा नगर येथील शोभा जयवंतराव पाटील या महिलेला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. गेल्या काही महिन्यांत या रस्त्यावर झालेल्या अपघातांमध्ये सुमारे पाच नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. वारंवार निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर दि. १८ मार्च रोजी दाजीबा नगर व परिसरातील महिलांनी अमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी उपअभियंता पी. ए. पाटील यांनी संबंधित कंत्राटदाराशी संपर्क साधून मंगळवारपर्यंत गळवाडे रोडवर आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याचे आश्वासन दिले. मात्र, दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास रस्ता खोदून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या आंदोलनात नेहा परदेशी, तृप्ती डाके, योजना पाटील, सरला पाटील, सुरेखा पाटील, संगीता सोनार, सुशीला पाटील, कविता पाटील, सरिता पाटील, निर्मलाबाई, मनीषा पाटील, संगीता कापडणे, सुमेरसिंग पाटील आदींसह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.

Leave a Reply