
राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने अमळनेरच्या शिक्षकांचा गौरव
अमळनेर (प्रतिनिधी) अहिल्यानगर येथे छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय ६ वे ग्रामीण साहित्य संमेलन तसेच “राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा झाला.
या सोहळ्यात महाराष्ट्रातील कवी, लेखक, गायक, ग्रामीण साहित्यिक, पोवाडाकार, लावणी सम्राट आणि प्रबोधनकार अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण संस्कृती जपण्यासाठी ग्रामीण साहित्याचे संवर्धन व जतन करणे हे आपले कर्तव्य असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाच्या औचित्याने शैक्षणिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा शाल, श्रीफळ, बुके, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव करण्यात आला. यामध्ये द्रौ. रा. कन्या शाळेचे पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक एस. पी. वाघ यांना “छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र गौरव पुरस्कार”, के. पी. सनेर माध्यमिक विद्यालय, जैतपीर येथील क्रीडाशिक्षक हिरालाल रमेश बाविस्कर यांना “राज्यस्तरीय गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार”, तसेच स्व. पद्मावती नारायणदास मुंदडा हायस्कूलचे क्रीडा शिक्षक गोकुळ विक्रम बोरसे यांना “गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार” देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्राप्त शिक्षकांवर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply