सकारात्मक विचार, निस्वार्थ कर्म आणि अध्यात्माचा संदेश; सानेगुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या बैठकीत प्रा. शिवाजीराव पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

अमळनेर, (प्रतिनिधी ): पूज्य सानेगुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक बैठकीत अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांनी अध्यात्म, विज्ञान, सकारात्मक विचार आणि चांगल्या कर्मांचे महत्त्व यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. जीवनात यशस्वी आणि आनंदी राहण्यासाठी निस्वार्थ कर्म, सकारात्मक ऊर्जा आणि विवेकपूर्ण विचार आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

प्रा. पाटील म्हणाले की, रामायण आणि महाभारत या महाकाव्यांमध्ये युद्धाचे प्रसंग असले तरी त्यातून सत्य, कर्तव्य आणि धर्मपालनाचा संदेश मिळतो. हात कमरेवर ठेवून उभा असलेला विठ्ठल हा कर्म, संयम आणि भक्तीचे प्रतीक असल्याने तो प्रत्येकाला अधिक जवळचा वाटतो, असे त्यांनी सांगितले.

प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मा, चैतन्य आणि अमर्याद क्षमता दडलेली असते. भौतिकशास्त्रानुसार प्रत्येक वस्तूचे स्वतंत्र अस्तित्व असते. दगडाला योग्य दिशा आणि बाह्यबल मिळाल्यास त्यातून सुंदर मूर्ती घडते. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीमध्येही मोठी उंची गाठण्याची क्षमता आहे. “कोण म्हणतं आकाशाला छेद पडत नाही, एकदा दगड उचलून तर पाहा,” या ओळींचा उल्लेख करत त्यांनी प्रयत्न, जिद्द आणि आत्मविश्वासाचे महत्त्व अधोरेखित केले.

सूर्य आणि चंद्र कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अखंड कार्यरत असतात. त्यांच्या कार्यातून निस्वार्थ कर्माची प्रेरणा घ्यावी. “जसे कर्म तसे फळ” हा निसर्गाचा अटळ नियम असल्याने प्रत्येकाने चांगल्या कर्मांचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले.

चार्ल्स डार्विन यांच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताचा संदर्भ देत विज्ञान, तर्क आणि अध्यात्म यांचा समतोल राखण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली. तसेच समवयस्क मित्रांच्या गाठीभेटींमध्ये इतरांविषयी नकारात्मक चर्चा टाळावी, कोणाच्याही आनंदात विरजण घालू नये आणि समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीस सचिव एस. एम. पाटील, सहसचिव श्रावण पाटील, उपाध्यक्ष उमाकांत नाईक, देविदास जगताप, सुधाकर पवार, गोविंद चित्ते यांच्यासह संघाचे अनेक सदस्य उपस्थित होते. यावेळी काही सदस्यांनी गीतगायन करून कार्यक्रमात रंगत आणली. प्रा. नरेंद्र सोनवणे यांनी पसायदान सादर करून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एम. पाटील यांनी केले.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *