
मंगळग्रह मंदिरात राष्ट्रकल्याण, संरक्षण व समृद्धीसाठी भव्य महारुद्र पूजेला सुरुवात
अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रकल्याण, देशाचे संरक्षण, समृद्धी तसेच विविध संकल्पपूर्तीनिमित्त मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात आयोजित तीन दिवसीय भव्य महारुद्र अभिषेक पूजेला बुधवार, ९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता भक्तिमय व मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. प्रधान आचार्य तथा वेदमूर्ती केशव प्रभाकर पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली या धार्मिक अनुष्ठानाला प्रारंभ झाला. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व त्यांच्या धर्मपत्नी आशाताई महाले यांच्या हस्ते अनुष्ठान कार्यास प्रारंभ करण्यात आला.
मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे प्रथमच तीन दिवसीय भव्य महारुद्र अभिषेक पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. महापूजेच्या प्रारंभी भूतशुद्धी व मंगलाचरण करण्यात आले. त्यानंतर मंदिरातील पंचधातूंच्या गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध आदी मंडलांचे पूजन करून महारुद्र पूजेदरम्यान सर्व देव-देवतांना उपस्थिती व कृपादृष्टीचे आवाहन करण्यात आले.
मानवकल्याण व देशाच्या संरक्षणासाठी विशेष संकल्पपूजा करण्यात आली. श्री मंगळग्रह देवांचा ५९४ आवर्तनांनी अभिषेक करण्यात आला. सायंकाळी सहा वाजता विशेष महाआरती झाली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. महाआरतीनंतर पहिल्या दिवसाच्या धार्मिक अनुष्ठानाची सांगता झाली.
या महारुद्र अभिषेक पूजेत सारंग पाठक, अथर्व कुलकर्णी, शुभम वैष्णव, यश जोशी, चंद्रकांत जोशी, परशुराम शर्मा, तुषार दीक्षित, प्रसाद भंडारी, जयेंद्र वैद्य, मंदार कुलकर्णी, वैभव लोकाक्षी, अक्षय जोशी, गणेश जोशी, पवन शर्मा, विनोद पाठक, दिव्येश जोशी, शैलेश जोशी, उमेश पंचभाई, निलेश रोडे, हेमंत गोसावी, गौरव मिश्रा, हरिओम शुक्ल, मनजीत मिश्रा आणि सूरज मिश्रा पौरोहित्य करीत आहेत. त्यांना उमेश पाठक, चेतन नाईक आणि प्रवीण भंडारी सहकार्य करीत आहेत.
श्री मंगळग्रह मंदिरातील स्वयंभू अतिजागृत मूर्तीवर ११ लघुरुद्र अर्थात १,३३१ रुद्र आवर्तने होणार आहेत. गुरुवारी उर्वरित आवर्तने पूर्ण केली जाणार असून शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी मंदिरातील स्थापित सर्व देवतांसाठी हवन, बलिदान व पूर्णाहुती होणार आहे.
११ सप्टेंबरला महारुद्र स्वाहाकाराची पूर्णाहुती
जगभरात निर्माण झालेल्या विविध नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांतून मातृभूमीचे रक्षण व्हावे, जगाचे कल्याण व्हावे आणि भगवान श्री मंगळग्रह देवांची सर्वांवर कृपादृष्टी राहावी, या उद्देशाने महारुद्र स्वाहाकाराचे आयोजन करण्यात आले आहे.
‘‘शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता महारुद्र स्वाहाकाराची पूर्णाहुती होणार आहे. भाविकांनी पूर्णाहुतीसाठी आवर्जून उपस्थित राहावे. शक्य असल्यास संपूर्ण दिवस हवन कार्यक्रमात सहभागी व्हावे. वेळेअभावी किमान दहा मिनिटे का होईना, भाविकांनी वेळ काढून हवनात सहभागी व्हावे,’’ असे आवाहन प्रधान आचार्य तथा वेदमूर्ती केशव प्रभाकर पुराणिक यांनी केले आहे.

Leave a Reply