
अमळनेर तालुक्यात दोन ठिकाणी चोरी; डंपरसह पाच गुरे चोरट्यानी लांबवली
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील गांधली व ढेकू येथे अज्ञात चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये डंपर व गुरे चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिसात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत निलेश संजय पाटील (रा. हिंगोणे) यांचा डंपर (एमएच ४८ एजी ८३०७ ) ३१ तारखेला सायंकाळी गांधली येथील सप्तशृंगी पेट्रोल पंपावर उभा केला होता. रात्री साडेअकराच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सुमारे १५ लाख रुपये किमतीचा डंपर चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, निलेश मोरे व प्रशांत पाटील यांच्या पथकाला तपासासाठी पाठवले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहिती तपासली असता आरोपी डंपर पातोंडा मार्गे चोपडा येथून गुजरातच्या दिशेने घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी डंपर मालकाच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत. दुसऱ्या घटनेत ढेकू खुर्द येथील महेंद्र सयाजीराव पाटील यांच्या ढेकू बुद्रुक शिवारातील गट क्रमांक ९७ मधील शेतातून १ तारखेला रात्री अज्ञात चोरट्यांनी चार गायी व एक गोऱ्हा अशी एकूण ८७ हजार रुपये किमतीची गुरे चोरून नेली. याप्रकरणीही अमळनेर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल लक्ष्मीकांत शिंपी करीत आहेत. तालुक्यात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी व वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply