आरटीई २५% प्रवेशाची निवड यादी आज होणार जाहीर; पालकांचे लागले यादीकडे लक्ष

अमळनेर (प्रतिनिधी) शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सन २०२६–२७ या शैक्षणिक वर्षासाठी काढण्यात आलेल्या ऑनलाईन सोडतीची (लॉटरी) निवड यादी आज, १० एप्रिल रोजी जाहीर होणार असून पालकांचे लक्ष या यादीकडे लागले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या आधी सोमवार, ६ एप्रिल रोजी सोडत प्रक्रिया पार पडली असून त्यानंतर शाळानिहाय नियमित निवड यादी व प्रतीक्षा यादी एकाचवेळी प्रसिद्ध करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. यामुळे प्रवेश प्रक्रियेला पारदर्शकता व गती मिळणार आहे. शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी वरिष्ठ तांत्रिक संचालक, एनआयसी, पुणे यांना पाठवलेल्या पत्रानुसार निवड प्रक्रिया अंतराच्या निकषावर आधारित चार टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. यामध्ये पहिली फेरी १ किलोमीटरपर्यंत, दुसरी १ ते ३ किलोमीटर, तिसरी ३ ते ५ किलोमीटर आणि त्यापुढील अंतरासाठी चौथी फेरी असा क्रम राहणार आहे. हेच निकष दिव्यांग आरक्षणासाठीही लागू असतील. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १० एप्रिलपासून एसएमएसद्वारे माहिती देण्यात येणार आहे. नियमित यादीतील प्रवेश प्रक्रिया सुरू असताना प्रतीक्षा यादीतील पालकांना कोणतेही संदेश पाठवू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

 

प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन लिंक देणार 

 

दरम्यान, निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना संबंधित शाळेत प्रवेश घेण्यासाठी १० ते  २० एप्रिल या कालावधीत ऑनलाईन लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निर्धारित मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *