विश्व नवकार महामंत्र दिनानिमित्ताने सामूहिक जप; अमळनेरात भक्तिमय वातावरण

अमळनेर (प्रतिनिधी) विश्व कल्याणाच्या उद्देशाने विश्व नवकार महामंत्र दिनानिमित्त सकल जैन बांधवांच्या वतीने सकाळी ८ ते ९ या वेळेत भांडारकर कंपाउंड येथील भवनात सामूहिक नवकार महामंत्र जपाचे आयोजन करण्यात आले. ‘णमो अरिहंताणं’ या पवित्र मंत्राच्या जपाने परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.

या उपक्रमात जैन समाजातील महिला, पुरुष, युवक-युवती तसेच ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. विश्व शांती, सद्भावना आणि सर्वांच्या कल्याणासाठी करण्यात आलेल्या या जपातून सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. रवींद्र जैन आणि नितीन शहा यांनी नवकार महामंत्राचे महत्त्व व त्यामागील आध्यात्मिक संदेश याविषयी थोडक्यात मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्वांनी शिस्तबद्ध पद्धतीने एकसुरात मंत्रोच्चार करत सामूहिक जप केला. या उपक्रमामुळे एकात्मता आणि अध्यात्मिकतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सकल जैन बांधवांनी परिश्रम घेतले. अशा उपक्रमांमुळे समाजात शांतता, सकारात्मक विचार आणि बंधुभाव वृद्धिंगत होतो, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *