गांधलीतील डंपर चोरी प्रकरणात मोठी कारवाई; मध्यप्रदेशातून आरोपीला अटक, न्यायालयीन कोठडीनंतर जिल्हा कारागृहात रवानगी

अमळनेर (प्रतिनिधी)  तालुक्यातील गांधली येथून डंपर चोरून त्याचे तुकडे करून परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीविरुद्ध अमळनेर पोलिसांनी मोठी कारवाई करत फरार असलेल्या एका आरोपीला मध्यप्रदेशातील धरमपुरी येथून अटक केली आहे. न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर कोठडीची मुदत संपल्याने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून त्याला जिल्हा कारागृहात पाठविण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गांधली येथील एका पेट्रोल पंपावर उभा असलेला डंपर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. चोरीनंतर हा डंपर एका गोदामात नेऊन त्याचे तुकडे करून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याची गोपनीय माहिती अमळनेर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून या प्रकरणातील आरोपी खाजुखान याला अटक केली होती. मात्र, इतर तीन आरोपी त्यावेळी फरार होण्यात यशस्वी झाले होते.

दरम्यान, फरार आरोपी फरीदखान मंजुरखान हा मध्यप्रदेशातील धरमपुरी न्यायालयात २४ जून रोजी एका प्रकरणात साक्षीसाठी हजर राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, पोलीस कर्मचारी विनोद संदानशिव आणि निलेश मोरे यांचे विशेष पथक मध्यप्रदेशात रवाना केले.

पोलीस पथकाने धरमपुरी न्यायालय परिसरात सापळा रचून आरोपी न्यायालयातून बाहेर येताच त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीला अमळनेर येथे आणून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीदरम्यान आरोपीकडे सखोल चौकशी करण्यात आली. कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून त्याला जिल्हा कारागृहात पाठविण्यात आले आहे. या गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून, चोरीच्या डंपरची विल्हेवाट लावण्यासाठी सहभागी असलेल्या इतर संबंधितांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *