
‘प्रताप संवाद’ पत्रिकेचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते प्रकाशन
अमळनेर (प्रतिनिधी) खान्देश शिक्षण मंडळ संस्थेच्या ‘प्रताप संवाद’ या शैक्षणिक ई-मासिकाचे प्रकाशन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राज्याचे मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, खासदार तथा मंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व्यंकैयाजी भागैय्या, बाळासाहेब चौधरी, तसेच अक्षय कृषी परिवारचे अध्यक्ष मनोजभाई सोलंकी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच, खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, कार्याध्यक्ष सीए नीरज अग्रवाल, ज्येष्ठ संचालक योगेश मुंदडे आणि इतर पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. ‘प्रताप संवाद’ या पत्रिकेचा मुख्य उद्देश विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक व संस्था यांच्यात प्रभावी सुसंवाद निर्माण करणे हा आहे. “संकल्प एक, ध्येय अनेक, सुसंवादासाठीच हे लेख” या ब्रीदवाक्यावर आधारित असलेले हे मासिक संस्थेतील विविध उपक्रम, विद्यार्थ्यांचे यश आणि शैक्षणिक घडामोडी सर्व संबंधितांपर्यंत पोहोचवणार आहे.
ही पत्रिका डिजिटल स्वरूपात तयार करण्यात आली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सर्वांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. तसेच, या मासिकात कोणत्याही प्रकारच्या राजकीय बातम्यांना स्थान दिले जाणार नसल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली. कार्याध्यक्ष सीए नीरज अग्रवाल यांनी या उपक्रमामागील भावना व्यक्त करताना सांगितले की, या सुसंवादातून विद्यार्थ्यांच्या करिअरला योग्य दिशा मिळावी हा मुख्य हेतू आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या विमोचनामुळे संस्थेच्या या उपक्रमाला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply