मासेमारीसाठी गेलेल्या एकाचा निसर्डी धरणात बुडून मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) मासेमारीसाठी निसर्डी धरणावर गेलेल्या ५५ वर्षीय इसमाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ४ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. नामदेव दामू भिल (वय ५५, रा. खडके) असे मृत इसमाचे नाव आहे. मासेमारीसाठी जाळे टाकताना पाण्यात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नामदेव दामू भिल हे ३ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास निसर्डी धरणावर मासेमारी करण्यासाठी गेले होते. माश्यांचे जाळे टाकण्यासाठी ते धरणाच्या पाण्यात गेले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली.

दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत नामदेव भिल घरी न परतल्याने त्यांच्या भावाने व नातेवाइकांनी शोधाशोध सुरू केली. धरण परिसरात सर्व बाजूंनी शोध घेतला असता धरणाच्या काठावर नामदेव यांचे कपडे आणि चपला आढळून आल्या. त्यामुळे कुटुंबीयांचा संशय बळावला.

त्यानंतर धरणाच्या पाण्यात शोध घेतला असता नामदेव दामू भिल यांचा मृतदेह पाण्यात पालथा तरंगताना आढळून आला. विशेष म्हणजे त्यांचे हात-पाय मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे मासेमारी करताना जाळ्यात अडकून पाण्यात बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती पोलीस पाटील जयदीप पाटील यांनी पोलिसांना दिली. मृत नामदेव भिल यांचे भाऊ संजय भिल यांनी अमळनेर पोलिसांत खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास अमळनेर पोलिसांकडून करण्यात येत आहे. मासेमारीसाठी घराबाहेर पडलेल्या नामदेव भिल यांचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने खडके परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *