मुडी प्र. डांगरीत सरपंच मंदाबाई पाटील यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर; २९४ मतांनी पायउतार

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथील सरपंच मंदाबाई भाऊराव पाटील यांच्यावर ग्रामस्थांनी अविश्वास ठराव मंजूर करत तब्बल २९४ मतांच्या फरकाने त्यांना पदावरून पायउतार केले. या प्रक्रियेदरम्यान अध्यासी अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांनी कामकाज पाहिले, तर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी सहकार्य केले.

सरपंच गावासाठी वेळ देत नसल्याचा आरोप तसेच इतर कारणांमुळे ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला होता. ठराव मंजूर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ५ मे रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या ग्रामसभेत मतदान प्रक्रिया पार पडली.

एकूण ७६६ ग्रामस्थांनी मतदानात सहभाग घेतला. त्यापैकी ५१४ ग्रामस्थांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने, तर २२० ग्रामस्थांनी विरोधात मतदान केले. ३२ मते बाद ठरली. त्यामुळे अविश्वास ठराव स्पष्ट बहुमताने मंजूर झाला. ५ मे रोजी सकाळी ११ वाजता ग्रामसभेला सुरुवात झाली. आवश्यक किमान उपस्थिती पूर्ण झाल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. तीन मतदान केंद्रांवर दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान झाले. त्यानंतर लगेच मतमोजणी पार पडली आणि निकाल जाहीर करण्यात आला. मतमोजणी प्रक्रियेत ग्रामसेवक पंकज पाटील, डिगंबर सैंदाणे, अविनाश पाटील, राहुल पाटील, सुभाष भोई, नितीन पाटील, इच्छाराम बाविस्कर आणि अशोक पाटील यांनी सहकार्य केले. निकाल जाहीर होताच गावकऱ्यांनी व युवकांनी जल्लोष साजरा केला. दरम्यान, नवीन लोकनियुक्त सरपंचाची निवड होईपर्यंत उपसरपंचांकडे पदभार सोपविण्यात आला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *