खान्देशच्या सुपुत्रांचा सुरतमध्ये विजयघोष; डॉ. नरेंद्र पाटील सलग दुसऱ्यांदा विजयी, संजय पाटील तिसऱ्यांदा नगरसेवक

अमळनेर (प्रतिनिधी) खांदेशच्या मातीतील सुपुत्रांनी गुजरातच्या राजकारणात पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे. सुरत महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत उधना (निलगिरी) परिसरातील नगरसेवक डॉ. नरेंद्र शांताराम पाटील यांनी तब्बल २० हजारांहून अधिक मताधिक्याने दणदणीत विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा नगरसेवकपद पटकावले. तर लिंबायत भागातून संजय केशव पाटील यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवत आपला राजकीय दबदबा कायम ठेवला आहे. या दुहेरी विजयामुळे खांदेश व अमळनेर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. नरेंद्र पाटील हे मूळचे अमळनेर तालुक्यातील मालपूर गावचे रहिवासी असून सध्या सुरत येथील उधना (निलगिरी) परिसरात स्थायिक आहेत. भारतीय जनता पक्षाने दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवत सलग दुसऱ्यांदा विजय संपादन केला. त्यांच्या या विजयामागे सातत्यपूर्ण जनसंपर्क, विकासकामांवरील भर आणि साधा, जिव्हाळ्याचा स्वभाव हे प्रमुख घटक मानले जात आहेत.

यापूर्वी त्यांनी उपमहापौर म्हणूनही प्रभावी कामगिरी बजावली आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या डॉ. पाटील यांनी गेल्या दोन दशकांत मतदारसंघात भक्कम जनाधार निर्माण केला आहे. त्यांच्या यशस्वी वाटचालीत पत्नी वैशाली पाटील यांचीही मोठी साथ लाभली आहे. खांदेशातील दोन्ही नेत्यांनी गुजरातमध्ये मिळवलेले हे यश भूषणावह मानले जात असून, त्यांच्या या कामगिरीमुळे अमळनेर व परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

विजय मतदारसंघातील जनतेला आणि खांदेशातील सर्व हितचिंतकांना समर्पित

 

विजयानंतर भावना व्यक्त करताना डॉ. नरेंद्र पाटील म्हणाले, “हा विजय माझ्या मतदारसंघातील जनतेने दिलेल्या प्रेमाचा आणि पक्षाने दाखवलेल्या विश्वासाचा आहे. केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील आणि आमदार संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाले. हा विजय मी माझ्या मतदारसंघातील जनतेला आणि खांदेशातील सर्व हितचिंतकांना समर्पित करतो.”

 

भाजपमध्ये विविध पदांवर काम

 

दरम्यान, अमळनेर शहराशी जवळीक असलेले संजय केशव पाटील यांनीही लिंबायत भागातून तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून विजय मिळवला आहे. ते अमळनेरमधील सानेनगर परिसराशी संबंधित असून पैलाड येथील पंढरीनाथ तानचंद देवरे यांचे जावई आहेत. त्यामुळे शहरातील दोन्ही भागात आनंदाची लाट उसळली आहे.

संजय पाटील यांनी १९९४ पासून भाजपमध्ये विविध पदांवर काम करत आपली राजकीय कारकीर्द घडवली. त्यांनी युवा मोर्चा पदाधिकारी, नगरसेवक, आरोग्य सभापती, स्थायी समिती सदस्य, नगरनियोजन समितीचे उपाध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. २०२१ ते २०२६ या कालावधीत त्यांनी शिक्षण समिती सदस्य तसेच क्रीडा व पर्यटन समितीचे अध्यक्ष म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी केली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *