सेफ्टी टॅंकमध्ये पडलेली गाय वाचवण्यास अग्निशमन विभागाला आले यश

अमळनेर (प्रतिनिधी) संताजी नगर परिसरात मंगळवारी दुपारी एक वाजता सेफ्टी टॅंकमध्ये गाय पडल्याची

थरारक घटना घडली. तिला वाचवण्यास अग्निशमन विभागाला यश आले.

याबाबत अधिक माहिती अशी की,  दुपारी सुमारे 4.30 वाजता संताजी नगर येथील पाण्याने भरलेल्या सेफ्टी टॅंकमध्ये एक गाय पडल्याची माहिती स्थानिक नागरिक भटू पाटील यांनी दूरध्वनीद्वारे अग्निशमन विभागास दिली. घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

त्यांच्या आदेशानुसार अग्निशमन विभागातील कर्मचारी काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. टॅंकमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असल्याने गाईचा जीव धोक्यात आला होता. मात्र अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत कौशल्याने आणि संयमाने बचावकार्य राबवले. योग्य साधनसामग्रीच्या मदतीने गाईला सुरक्षितरित्या टॅंकमधून बाहेर काढण्यात आले.

या बचाव मोहिमेत अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी, फारुक शेख, तसेच फायरमन दिनेश बिऱ्हाडे आणि आकाश संदानशिव यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या तत्परतेमुळे आणि धाडसामुळे गाईचा जीव वाचला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागाच्या संपूर्ण पथकाचे मनःपूर्वक आभार मानले. या घटनेमुळे पुन्हा एकदा आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन विभागाची तत्पर सेवा आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *