
गौण खनिज प्रकरणात तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या निलंबनाविरोधात महसूल यंत्रणा आक्रमक
अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेरचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्यावर गौण खनिज चोरी प्रकरणी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने १२ ऑगस्ट रोजी निलंबनाची कारवाई केल्यानंतर महसूल अधिकारी व कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे. या कारवाईचा निषेध करत जळगाव जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांनी एकत्र येत सुराणा यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली असून, निषेध म्हणून अवैध गौण खनिज कारवायांवरील कारवाईवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत महसूल अधिकारी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महसूल विभागाच्या अप्पर सचिवांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी गेल्या सहा महिन्यांत तापी व गिरणा नदीपात्रात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात केलेल्या कारवायांचा तपशील सादर करण्यात आला आहे. जप्त केलेली वाहने, वसूल केलेला लाखो रुपयांचा दंड आणि दाखल करण्यात आलेले गुन्हे यांची माहिती देत त्यांच्यावरील निष्क्रियतेचा आरोप फेटाळण्यात आला आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गौण खनिज चोरी रोखण्याची जबाबदारी केवळ महसूल विभागाची नसून प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्राम दक्षता समित्या यांचीही संयुक्त जबाबदारी असते. मात्र प्रत्यक्षात महसूल अधिकाऱ्यांना सातत्याने शारीरिक हल्ले, मानसिक त्रास आणि धमक्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीतही अधिकारी आणि कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडत असून त्यांना आवश्यक संरक्षण मिळत नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे.
लोकप्रतिनिधींचा दबाव, सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारी आणि गौण खनिज माफियांच्या धमक्यांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनोबल या निलंबनामुळे खच्ची झाले असल्याचा दावा संघटनेने केला आहे. रुपेशकुमार सुराणा यांच्यावरील कारवाई एकतर्फी, अवाजवी आणि अन्यायकारक असल्याने त्यांना सुनावणीची संधी देण्यात यावी, निलंबन मागे घेण्यात यावे आणि त्यांची अमळनेर येथे पूर्ववत नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर जिल्हा पुनर्वसन अधिकारी जितेंद्र कुवर, उपजिल्हाधिकारी मंजुषा घाटगे, पाचोरा प्रांताधिकारी भूषण अहिरे, उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, बोदवड तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, चाळीसगाव प्रांताधिकारी प्रमोद हिले, भुसावळ प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, एरंडोल प्रांताधिकारी एम. ए. गायकवाड, अमळनेर प्रांताधिकारी मयूर भंगाळे, फैजपूर प्रांताधिकारी बबन काकडे, चाळीसगाव तहसीलदार प्रशांत पाटील, मुक्ताईनगर तहसीलदार गिरीश वखारे, महसूल तहसीलदार ज्योती गुंजाळ, अंगद आसटकर, उल्हास देवरे, एरंडोल तहसीलदार गोपाळ पाटील, जामनेर तहसीलदार एन. एस. आगळे, चोपडा नायब तहसीलदार योगेश पाटील, ज्योती वसावे, तहसीलदार विजय सूर्यवंशी, सुनील जमदाने, महेंद्र सूर्यवंशी, नीता लबडे, रवींद्र उगले, शीतल सोलार, शीतल राजपूत, विनय गोसावी आणि मोहनमाला नाझीरकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply