
आंतरमहाविद्यालयीन बेसबॉल स्पर्धेत बी.पी. आर्ट्स कॉलेजचे पुरुष-महिला संघ विजेते
अमळनेर (प्रतिनिधी) कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड यांच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन बेसबॉल क्रीडा स्पर्धा (पुरुष व महिला) अमळनेर येथील क्रीडा संकुलात उत्साहात पार पडल्या. स्पर्धेत पुरुषांचे चार आणि महिलांचे चार संघ सहभागी झाले होते. दोन्ही गटांतील खेळाडूंनी उत्कृष्ट क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन करत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
पुरुष गटात बी.पी. आर्ट्स कॉलेज, चाळीसगाव संघाने विजेतेपद पटकावले, तर एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी कॉलेज, बांबोरी संघाने उपविजेतेपद मिळविले. महिला गटातही बी.पी. आर्ट्स कॉलेज, चाळीसगाव संघाने विजेतेपद मिळविले, तर प्रताप महाविद्यालय, अमळनेर संघ उपविजेता ठरला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवडचे प्राचार्य डॉ. वसंत देसले होते. स्पर्धेचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रा. डॉ. संदीप नेरकर, प्रताप महाविद्यालय यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. अमृत अग्रवाल, प्रा. डॉ. शैलेश पाटील, प्रा. डॉ. खुशाल देशमुख, प्रा. मुकुंद शिरसाठ आणि डॉ. सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेतील सामन्यांचे पंच म्हणून जयेश मासरे व सिद्धार्थ पाटील यांनी काम पाहिले. इतर पंचांनीही स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य केले. महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचे प्रा. डॉ. देवदत्त पाटील यांनी स्पर्धेच्या आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत स्पर्धेचे नियोजन, संघांचा समन्वय, खेळाडू व पंचांची व्यवस्था तसेच सामने सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक नियोजन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील क्रीडा विभाग, प्राध्यापक, कर्मचारी तसेच संबंधित सर्वांनी सहकार्य केले.

Leave a Reply