पिंपळे रोडवरील नाल्यात मोटरसायकल घसरून पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील पिंपळे रोडवरील ऐंशी फुटी रस्ता संपतो त्या ठिकाणी असलेल्या नाल्यात मोटरसायकल घसरून पडल्याने पोलीस कर्मचारी भरत एकनाथ गायकवाड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजण्यापूर्वी घडली. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मयत भरत एकनाथ गायकवाड (वय ४४) हे मूळचे अंबाळा, ता. चोपडा, जि. जळगाव येथील रहिवासी होते. सध्या ते अमळनेर येथील अंजनी बिल्डिंग, रूम क्रमांक १, पोलीस लाईन, ढेकू रोड येथे राहत होते. ते अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार पदावर कार्यरत होते. ९ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्याच्या शासकीय वाहनाचे चालक पोलीस कॉन्स्टेबल सुनील भुता पाटील यांनी गांधीलीपुरा पोलीस चौकीला फोन करून पिंपळे रोडवरील नाल्यात एक व्यक्ती मोटरसायकलसह पडल्याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस हवालदार विजय आत्माराम भोई आणि इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांना नाल्यात एक इसम मृतावस्थेत पडलेला आढळून आला. त्याच्या अंगावर हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल (एमएच-१९-एझेड-३८४१ ) पडलेली होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह तसेच मोटरसायकल नाल्यातून बाहेर काढली. प्राथमिक माहितीनुसार, भरत गायकवाड हे मोटरसायकलवरून जात असताना त्यांची मोटरसायकल घसरून ते नाल्यात पडले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याजवळ तसेच कानातून रक्तस्राव झाला. त्यातच मोटरसायकल त्यांच्या अंगावर पडल्याने ते पाण्यात बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. मोटरसायकल व इतर साहित्य पुढील तपासासाठी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड पुढील तपास करीत आहेत. भरत एकनाथ गायकवाड यांच्या अपघाती मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पोलीस दलातील सहकाऱ्यांमधूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *