आदिवासी बांधवांसाठी विविध कल्याणकारी उपक्रम; ९ लाख ८० हजार रुपयांच्या धनादेशांचे होणार वाटप : आमदार अनिलदादा पाटील

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह

अमळनेर (प्रतिनिधी) भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यात ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह-२०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात आदिवासी समाजाच्या सन्मानासह आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक विकासासाठी विविध लोककल्याणकारी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिलदादा पाटील यांनी दिली.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार हा सप्ताह केवळ जयंती उत्सवापुरता मर्यादित न ठेवता आदिवासी समाजाचे हक्क, अस्मिता, संस्कृती आणि सर्वांगीण विकास यांना प्राधान्य देणारा उपक्रम म्हणून साजरा करण्यात येणार आहे. क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांनी अन्याय, शोषण आणि परकीय सत्तेविरुद्ध संघर्ष करून आदिवासी समाजाला संघटित होण्याची, आपल्या हक्कांसाठी लढण्याची आणि स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली. त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. १३ नोव्हेंबर रोजी आदिवासी विकास विभागाच्या न्यूक्लियस बजेट योजनेंतर्गत १७ आदिवासी लाभार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे एकूण ८ लाख ५० हजार रुपये, तर राणी दुर्गावती आदिवासी महिला बचत गटांतर्गत १३ लाभार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांप्रमाणे एकूण १ लाख ३० हजार रुपयांचे धनादेश वितरित करण्यात येणार आहेत. अशा प्रकारे एकूण ९ लाख ८० हजार रुपयांचे धनादेश पात्र लाभार्थ्यांना दिले जाणार असून नवीन अर्जांचे संकलनही करण्यात येणार आहे. याशिवाय धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, पीएम-जनमन तसेच महिला बचत गटांना विविध शासकीय योजनांचा लाभ वितरित केला जाणार आहे. कृषीपूरक व्यवसाय, सिंचन सुविधा आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन साधण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शनही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

१४ नोव्हेंबर रोजी महापुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता करून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. आदिवासी समाजाची समृद्ध लोककला, लोकपरंपरा, देव-देवता आणि सांस्कृतिक वारसा यांचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत. १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा जयंतीचा मुख्य सोहळा होणार असून त्यांच्या प्रतिमेसह स्थानिक आदिवासी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणारे पद्म पुरस्कार विजेते, ‘मन की बात’ कार्यक्रमात गौरव झालेले आदिवासी समूह, समाजसेवक, बुद्धिजीवी तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा जिल्हास्तरावर विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

१६ नोव्हेंबर रोजी नागरी सेवा आणि शासकीय कागदपत्रांसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेताना कागदपत्रांअभावी अडचणी येऊ नयेत, यासाठी ओळखपत्रे व विविध शासकीय कागदपत्रांची दुरुस्ती आणि अद्ययावतीकरण केले जाणार आहे. वनपट्टेधारकांना लाभवाटप, कृषी योजनांची ऑनलाइन नोंदणी, पीकविमा तसेच विविध ई-सेवांची प्रात्यक्षिके देऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. १७ नोव्हेंबर रोजी आरोग्य तपासणी शिबिरांसह आरोग्य आणि पोषणविषयक जनजागृती केली जाणार आहे, तर १८ नोव्हेंबर रोजी युवक-युवतींच्या सक्षमीकरणाच्या उपक्रमांनी सप्ताहाचा समारोप होणार आहे.

‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह-२०२६’ हा केवळ एका महापुरुषाच्या जयंतीचा कार्यक्रम नसून आदिवासी समाजाच्या अस्मितेचा, आत्मसन्मानाचा आणि सर्वांगीण विकासाचा सामूहिक संकल्प आहे. भगवान बिरसा मुंडा यांनी ज्या समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष केला, त्या समाजातील प्रत्येक कुटुंबाला शिक्षण, आरोग्य, रोजगार, आर्थिक स्वावलंबन आणि शासकीय योजनांचा लाभ मिळावा, हीच त्यांच्या जयंतीनिमित्त खरी आदरांजली ठरेल, असे आमदार अनिलदादा पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, अमळनेर मतदारसंघातील सर्व आदिवासी बांधव, शेतकरी, युवक-युवती, महिला भगिनी आणि नागरिकांनी या सप्ताहातील विविध उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने व उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार अनिलदादा पाटील यांनी केले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *