बुलेटच्या आवाजावरून तांदळीत दोन गटात तुफान हाणामारी; विनयभंगासह परस्परविरोधी गुन्हे दाखल

हळदीच्या कार्यक्रमात वाद चिघळला; तिघे जखमी, चारचाकीची काच फोडली

 

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील तांदळी येथे हळदीच्या कार्यक्रमादरम्यान बुलेट मोटारसायकलीच्या सायलेन्सरच्या कर्कश आवाजावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना ३ मे रोजी रात्री घडली. या प्रकरणात तिघेजण जखमी झाले असून एका महिलेचा विनयभंग झाल्याची तक्रारही करण्यात आली आहे. मारवड पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील तांदळी येथील एका ३० वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा मुलगा मयूर हा गावातील भूषण रमेश शिरसाठ यांच्या हळदीच्या कार्यक्रमाला गेला होता. पहाटे दीड वाजेच्या सुमारास तो बुलेटवरून घरी परतत असताना राजू गुलाब शिरसाठ, संदीप हरचंद शिरसाठ, सोनत्या बापू शिरसाठ व सौरभ वसंत शिरसाठ यांनी “बुलेटचा मोठा आवाज का करतो” असा जाब विचारत त्याला चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर महिलेच्या पतीने याबाबत विचारणा केली असता संदीप शिरसाठ यांनी अंगणातील वीट उचलून त्यांच्या डोक्यात मारल्याने ते जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी दरवाजाला लाथ मारून घरात प्रवेश केला व महिलेची साडी ओढून तिचा विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. झटापटीत तिची सोन्याची चैनही तुटली. तसेच चारचाकी वाहनावर दगडफेक करून काच फोडण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, दुसऱ्या गटाकडून संदीप शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मयूर शिरसाठ हा हळदीच्या कार्यक्रमात बुलेटच्या सायलेन्सरचा कर्कश आवाज करत होता. त्याला रोहित शिरसाठ यांनी जाब विचारल्यानंतर मयूर रघुनाथ पारवे, रघुनाथ पारवे व भूषण पारवे यांना घेऊन रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास आला. रघुनाथ पारवे यांच्या हातात धारदार शस्त्र होते. तिघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच मयूरने हातातील कड्याने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या मारहाणीत संदीप शिरसाठ जखमी झाले. तसेच सुरत येथून आलेले पाहुणे विशाल संतोष चव्हाण हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांच्यावरही धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. या दोन्ही प्रकरणांमध्ये मारवड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल संजय सूर्यवंशी करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *