क्रेनच्या धडकेत पायी सायकल लोटत घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू; अफवेमुळे रस्ता रोको

अमळनेर (प्रतिनिधी)  शहरातील सिंधी कॉलनीजवळ सायकल पायी लोटत घेऊन जाणाऱ्या एका वृद्धाला मागून भरधाव येणाऱ्या क्रेनने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २४ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, वाळूच्या डंपरने धडक दिल्याची अफवा पसरल्याने काही काळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले व वाहतुकीची कोंडी झाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, जयरामदास धर्मानी हे अमळनेर शहराकडून सिंधी कॉलनीकडे सायकल हातात घेऊन पायी जात असताना मागून आलेल्या मोठ्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली व क्रेन चालक घटनास्थळावरून पसार झाला. काही वेळाने वाळूच्या बिननंबरच्या डंपरने धडक दिल्याची अफवा पसरल्याने संतप्त नागरिकांनी वृद्धाचे पार्थिव रस्त्यावर ठेवून रस्ता रोको आंदोलन सुरू केले.

घटनास्थळी पोलीस पोहोचल्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी वाहतूक सुरळीत करण्याचे आवाहन केले. आंदोलकांनी वाळूचे डंपर बंद करण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अपघात क्रेनने केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी व्हिडिओ आंदोलकांना दाखवल्यानंतर गैरसमज दूर झाला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, उपनिरीक्षक कविता ठाणगे, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, संजय बोरसे, विनोद संदानशिव, सिद्धांत शिसोदे, रवींद्र बोरसे, रवी पाटील यांनी घटनास्थळी वाहतूक सुरळीत केली. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तापी प्रकल्पाच्या उपसा योजनेच्या कामासाठी धुळे येथील सुनील जाधव यांच्या मालकीची ही क्रेन असून अपघातानंतर चालकाने क्रेन गांधली शिवारात सोडून पळ काढला होता. हेडकॉन्स्टेबल गणेश शिंदे यांनी क्रेन जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *