शेतकी संघाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी मोकळ्या जागेवर गोडाऊन, कोल्ड स्टोरेज, पेट्रोलपंप उभारणार

सर्व तांत्रिक अडचणी दूर करून उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याचे आमदार अनिलदादा पाटील यांचे आश्वासन

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुका शेतकी संघाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी संघाच्या मोकळ्या जागेचा उपयोग करून गोडाऊन, कोल्ड स्टोरेज किंवा पेट्रोलपंप यांसारखे उत्पन्नाचे प्रकल्प उभारण्यासाठी सर्व तांत्रिक अडचणी दूर करून प्रयत्न केले जातील, असे आश्वासन आमदार अनिलदादा पाटील यांनी दिले. शेतकी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर उपस्थित सभासदांना मार्गदर्शन करताना त्यांनी संघाच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

अमळनेर तालुका शेतकी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जुना टाऊन हॉल येथे संघाचे अध्यक्ष संभाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सुरुवातीला सभेसाठी आवश्यक कोरम पूर्ण नसल्याने सभा अर्धा तास तहकूब करण्यात आली. त्यानंतर दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व्यवस्थापक संजय पाटील यांनी सभेसमोर अहवालाचे वाचन केले. सभेदरम्यान अनेक सभासदांनी आपल्याला अजेंडा मिळाला नसल्याची तक्रार केली. तसेच शेतकी संघाचे भंगार विकण्याच्या विषयावर काही सभासदांनी विरोध दर्शविण्याचा प्रयत्न केला. त्यावर भंगाराची विक्री पारदर्शक पद्धतीने आणि जाहीर लिलावाद्वारे करावी, या अटीवर ठराव मंजूर करण्यात आला. सभेच्या व्यासपीठावर अध्यक्ष संभाजी पाटील, उपाध्यक्ष गणेश भामरे, संजय पुनाजी पाटील, सचिन पाटील, प्रफुल पवार, विक्रांत पाटील, सुषमा देसले, सुरेश पिरन पाटील, नितीन पाटील, जितेंद्र पाटील, मालुबाई पवार, शंकर बैसाणे आणि रणजित पाटील उपस्थित होते. सभेला ज्येष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील, माजी अध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, सुरेश पाटील, जयवंतराव पाटील, संदीप घोरपडे आणि बन्सीलाल भागवत यांनी चर्चेत सहभाग घेतला.

सभा संपल्यानंतर आमदार अनिल पाटील यांनी उपस्थिती लावली. यावेळी सभासदांनी शेतकी संघाला शासकीय खरेदी केंद्र मिळवून देण्याची मागणी केली. त्यावर आमदार अनिल पाटील यांनी सभासदांना मार्गदर्शन करताना शेतकी संघाच्या पडून असलेल्या मोकळ्या जागेचा उपयोग करून उत्पन्नाची साधने कशी निर्माण करता येतील, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. गोडाऊन, कोल्ड स्टोरेज किंवा पेट्रोलपंप यांसारखे प्रकल्प उभारण्याच्या शक्यता तपासून सर्व तांत्रिक अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *