
गिरीश महाजन यांचे मॉर्फ फोटो प्रसारित करणाऱ्यांवर कारवाईची मागणी; भाजपचे पोलिसांना निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी करण्यात येत असल्याचा आरोप करत संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी खासदार स्मिता वाघ उपस्थित होत्या.
भाजपच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या दोन-तीन दिवसांपासून मंत्री गिरीश महाजन यांचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवर काही उपद्रवी व्यक्तींमार्फत प्रसारित केले जात आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून एका राजकीय व्यक्तिमत्त्वाची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असून, यामागील संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच अशा प्रकारचे फोटो प्रसारित करणाऱ्यांसह ते जाणूनबुजून लाईक, शेअर अथवा व्हायरल करणाऱ्या बेजबाबदार व्यक्तींविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. समाजात दिशाभूल करणारी व द्वेषपूर्ण माहिती पसरविणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी जानवे मंडळ अध्यक्ष जिजाबराव पाटील, पातोंडा मंडळ अध्यक्ष राहुल पाटील, शहराध्यक्ष योगेश महाजन, डॉ. अनिल शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. व्ही. आर. पाटील, गिरीश पाटील, बाजार समिती संचालक प्रफुल पवार, हिरालाल पाटील, जितेंद्र पाटील, राहुल पाटील, देवा लांडगे, विजय राजपूत, अमोल पाटील, राहुल चौधरी, भरतसिंग परदेशी, श्रीनिवास मोरे, भारती सोनवणे, माधुरी पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply