
एकतानगरातील घरफोडीत साडेआठ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; साखरपुड्यासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाला फटका
अमळनेर (प्रतिनिधी) घरातील सर्व सदस्य साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एकतानगरातील जिनगर गल्ली परिसरातील तिसऱ्या मजल्यावरील घराचे कुलूप तोडून कपाटातील सुमारे ८ लाख ६६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना रविवारी (दि. २१) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, छगन चुडामन बिऱ्हाडे (रा. एकतानगर, जिनगर गल्ली, अमळनेर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या पुतण्याचा साखरपुडा असल्याने त्यांनी २० जून रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून सुरत येथे प्रस्थान केले होते. दरम्यान, २१ जून रोजी सकाळी आठ वाजता मंगलाबाई रातीलाल बिऱ्हाडे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधत दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील घरांचे कुलूप तुटलेले असून दरवाजे उघडे असल्याची माहिती दिली. चोरी झाल्याचे समजताच छगन बिऱ्हाडे तातडीने अमळनेरला रवाना झाले व दुपारी अडीच वाजेपर्यंत घरी पोहोचले. घराची पाहणी केली असता खालच्या मजल्यावरील कुलूप जसेच्या तसे आढळून आले. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील घरांचे दरवाजे व कपाटांची कुलपे तोडण्यात आल्याचे दिसून आले. कपाटातील सोन्याचे दागिने गायब असल्याचे निदर्शनास आले. चोरीस गेलेल्या ऐवजात अर्धा ग्रॅम वजनाची बाळाची सोन्याची अंगठी, २५.१८ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, ५.०७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पोत पेंडल, ९.३४ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, १.४७ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या मंगळसूत्राच्या वाट्या, २.८३ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील बाळ्या तसेच ३५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा चपला हार यांचा समावेश असून एकूण ८ लाख ६६ हजार ६८ रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.
विशेष म्हणजे, जिनगर गल्ली हा दाट लोकवस्तीचा व अरुंद परिसर असल्याने येथे चोरी करणे अवघड मानले जाते. खालच्या मजल्यावरील कुलूप अबाधित असल्यामुळे चोरट्यांनी शेजारच्या घराच्या छतावरून किंवा इमारतीच्या बाजूने प्रवेश करून ही घरफोडी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply