रात्रभर कर्तव्यावरच्या पोलिसांना मिळाली ‘माणुसकीची मेजवानी’; संकलेचा परिवार अन् हाऊस ऑफ बिर्याणीचा पुढाकार

कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्ड पोलिसांना अन्नाचा आधार; दोन्ही सेवाभावी उपक्रमांचे आमदार,पोलीस प्रशासनाकडून कौतुक

अमळनेर (प्रतिनिधी) गणेशोत्सवानिमित्त अनंत चतुर्दशीला झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचारी व होमगार्ड बांधवांसाठी सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. स्वर्गीय दिनेश संकलेचा व स्वर्गीय विवेक संकलेचा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उद्योजक महेश संकलेचा व रोनक संकलेचा यांच्या वतीने सुमारे ३५० पोलीस कर्मचारी व होमगार्ड बांधवांना पुरी-भाजी व राईसचे फूड पॅकेट वाटप करण्यात आले.

अमळनेर पत्रकार संघ व मुंदडा बिल्डर्स यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या मंचावर अप्पर पोलीस अधीक्षक नखाते, डीवायएसपी विनायक कोते व पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या हस्ते फूड पॅकेट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते संकलेचा परिवाराचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर बंदोबस्ताच्या विविध ठिकाणी पोलीस कर्मचारी व होमगार्ड बांधवांपर्यंत फूड पॅकेट पोहोचविण्यात आले. संकलेचा परिवाराकडून दरवर्षी हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

हाऊस ऑफ बिर्यानीचेही योगदान

 

हाऊस ऑफ बिर्यानीचे संचालक शेखर राजपूत यांच्या वतीनेही दरवर्षीप्रमाणे यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस बांधवांना व्हेज बिर्याणी व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. संकलेचा परिवार आणि हाऊस ऑफ बिर्यानी यांच्या या दोन्ही उपक्रमांचे पोलीस प्रशासनाने कौतुक करून आभार मानले. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान रात्री उशिरापर्यंत उभे राहून बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलीस कर्मचारी व होमगार्ड बांधवांना या उपक्रमातून मोठा आधार मिळाला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *