
भूमी सुपोषण अभियानाचा महिनाभराचा जनजागर पूर्ण; अक्षय्य तृतीये दिवशी भव्य सांगता सोहळा
अमळनेर (प्रतिनिधी) अक्षय कृषी परिवार आणि मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या भूमी सुपोषण अभियान राष्ट्रीय चळवळीला एक महिना पूर्ण होत असून, या निमित्ताने रविवार दि. १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षय्य तृतीयेच्या पवित्र मुहूर्तावर भव्य सांगता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभियानाचा शुभारंभ गुरुवार, दि. १९ मार्च २०२६ रोजी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते विविध मान्यवर आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झाला होता. त्यानंतर ही चळवळ देशभर राबविण्याचा संकल्प करण्यात आला. अमळनेर तालुक्यातील १५६ गावांमध्ये जनजागर करण्याचे उद्दिष्ट ठेवून दररोज जनजागर रथाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अभियानाचा उद्देश, महत्त्व आणि कार्य पोहोचविण्यात आले.
वर्ष प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी श्री मंगळग्रह मंदिरात सुरू झालेल्या या उपक्रमाने महिनाभरात मोठा प्रतिसाद मिळवला आहे. आता अक्षय्य तृतीया या हिंदू धर्मातील अत्यंत शुभ मुहूर्तावर सकाळी ८:०० वाजता श्री मंगळग्रह मंदिर येथे या अभियानाचा मासिक जनजागर सांगता सोहळा भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार आहे. या सोहळ्यास समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहणार आहेत. यावेळी भूमी सुपोषण अभियानाचा उद्देश, कार्यपद्धती, व्याप्ती आणि भविष्यातील परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमातून रासायनिक खते व कीटकनाशकांचा अतिरेक टाळून जमिनीची सुपीकता जपण्याचा संदेश दिला जाणार आहे. तसेच भविष्यातील पिढ्यांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी नैसर्गिक शेतीकडे वळण्याचा संकल्पही शेतकऱ्यांकडून केला जाणार आहे. या अभियानात अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी एक मूठ माती घेऊन सहभागी व्हावे
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी होणाऱ्या या सोहळ्यास उपस्थित राहताना शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील एक मूठ माती सोबत आणावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ही माती एकत्रित करून तिचे विधिवत पूजन करण्यात येणार असून, त्यानंतर ती माती पुन्हा आपल्या शेतात टाकण्याचा संकल्प केला जाणार आहे.

Leave a Reply