अवैध गौण खनिज वाहतुकीवर महसूल व पोलिसांची संयुक्त कारवाई; दोन ट्रॅक्टरसह ५.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमळनेर (प्रतिनिधी)  अमळनेर तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभाग आणि पोलिसांनी स्वतंत्र कारवाया करत दोन ट्रॅक्टरसह सुमारे ५ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू व मुरूम वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पहिल्या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज यांना १५ जुलैच्या रात्री तापी नदी पात्रातून जळोद रस्त्याने अवैध वाळू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे, सुनील तेली आणि मिलिंद सोनार यांना कारवाईसाठी रवाना करण्यात आले. रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास जळोद-अमळगाव रस्त्यावर एमएच-१९-सीव्ही-२३८४ क्रमांकाचा ट्रॅक्टर अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना आढळून आला. चालकाने आपले नाव गणेश दशरथ शिंदे (वय २८) असे सांगितले. पोलिसांनी ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर आणि १२ हजार रुपये किमतीची वाळू असा एकूण ३ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत. दरम्यान, महसूल विभागानेही स्वतंत्र कारवाई करत अवैध मुरूम वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त केला. प्रांताधिकारी मयूर भंगाळे आणि तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार सी. यू. पाटील, मंडळाधिकारी नरेंद्रकुमार धनराळे, योगेश पाटील, ग्राम महसूल अधिकारी अशपाक पिंजारी, अभिमान जाधव, राजेंद्र बारी, प्रसाद पाटील आणि भूषण पाटील यांनी १४ जुलै रोजी दुपारी टाकरखेडा रस्त्यावर डॉ. बी. एस. पाटील यांच्या आश्रमशाळेमागे छापा टाकला. यावेळी एमएच-२९-एके-२३३३ क्रमांकाचा ट्रॅक्टर एक ब्रास मुरूम भरताना आढळून आला. चालकाने आपले नाव हर्षल भाऊराव पवार, रा. भोईवाडा, पैलाड असे सांगितले. पथकाने २ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर आणि १२ हजार रुपये किमतीचा मुरूम असा २ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ५ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *