
भाजपाच्या जळगाव पश्चिम जिल्हा वाहतूक आघाडीच्या जिल्हा संयोजकपदी अजय केले यांची नियुक्ती
अमळनेर (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाच्या जळगाव पश्चिम जिल्हा वाहतूक आघाडीच्या जिल्हा संयोजकपदी अमळनेर येथील कार्यकर्ते अजय रघुनाथ केले यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव येथील पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही नियुक्ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र दत्तात्रय चव्हाण यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. तसेच जलसंपदामंत्री गिरीश दत्तात्रय महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे, वस्त्रोद्योगमंत्री संजय पांडुरंग सावकारे आणि प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे यांच्या मान्यतेने ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय खासदार स्मिता उदय वाघ, आमदार सुरेश दामू भोळे, प्रदेश सचिव मंगेश चंद्रकांत चव्हाण, आमदार अमोल हरिभाऊ जावळे आणि नंदकिशोर महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी अजय रघुनाथ केले यांच्या नियुक्तीची घोषणा केली. नियुक्तीपत्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्र प्रथम, एकात्म मानवतावाद, अंत्योदय आणि मूल्याधारित राजकारण या मूलभूत विचारधारेचा उल्लेख करण्यात आला आहे. पक्षशिस्त, संघभावना आणि परस्पर सहकार्य या तत्त्वांनुसार कार्य करत केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. अमळनेर तालुक्यातील कार्यकर्त्याला भाजपाच्या जिल्हास्तरीय संघटनात्मक जबाबदारीची संधी मिळाल्याने स्थानिक भाजपामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अजय रघुनाथ केले यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि वाहतूक आघाडीचे कार्य प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply