गोवंश कत्तल प्रकरणात पालिकेवर संशयाची सुई; कत्तलखाना तपासा, मुख्य सूत्रधारही उघडा करा

अमळनेर (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) ३ जुलै रोजी उघडकीस आणलेल्या कथित बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणानंतर आता संशयाची सुई थेट अमळनेर नगरपालिकेकडे वळली आहे. अधिकृत कत्तलखान्यावर गंभीर आरोप होत असताना पालिका प्रशासनाचे मौन, तपासाबाबतची अनास्था आणि जबाबदार अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद – बजरंग दलाने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना सविस्तर निवेदन देत संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी केली आहे.

याबाबत संघटनेचे म्हणणे आहे की, एलसीबीने धाडसी कारवाई करून प्रकरण उघड केले, मात्र त्यानंतर तपासाचा वेग मंदावल्याचे दिसत आहे. केवळ घटनास्थळी सापडलेल्या काही व्यक्तींवर कारवाई करून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न होत आहे का, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या अवैध व्यवसायामागील मुख्य सूत्रधार, आर्थिक लाभार्थी, वाहतूक साखळी आणि संपूर्ण जाळे उघड करून सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ज्या ठिकाणाहून तीन जिवंत गोवंशांची सुटका करण्यात आली, त्याच परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंशांच्या कातड्यांचा साठा आढळला. या कातड्यांचा स्वतंत्र पंचनामा करून जप्ती करण्यात यावी, त्यांचा उगम, वाहतूक, साठवणूक आणि संबंधित व्यक्तींची चौकशी करून स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात यावेत.

 

नगरपालिकेच्या कत्तलखान्यावर थेट बोट; प्रशासन गप्प का?

 

या प्रकरणातील सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे नगरपालिकेच्या अधिकृत कत्तलखान्यावर करण्यात आलेले आरोप. परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून तेथे गोवंशाची कत्तल होत असल्याच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आरोप सिद्ध झाल्यास संबंधित कत्तलखाना तात्काळ बंद करून जबाबदार अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनासह कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच कत्तलखान्यात नेमक्या कोणत्या प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी आहे, प्रत्यक्षात कोणत्या प्राण्यांची कत्तल केली जाते, त्याच्या नोंदी, तपासणी आणि देखरेख यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अधिकृत कत्तलखाना पालिकेच्या नियंत्रणाखाली असताना तेथे नियमांचे पालन झाले की नाही, याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

 

तपासाबाबत उपस्थित झालेले गंभीर प्रश्न

 

विश्व हिंदू परिषद – बजरंग दलाने तपास प्रक्रियेवरही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. एलसीबीने धडक कारवाई केल्यानंतर पुढील तपास स्थानिक पोलिसांकडे का वर्ग करण्यात आला? एलसीबीनेच पुढील तपास का केला नाही? घटनास्थळी ताब्यात घेतलेल्या व्यक्ती आणि नंतर दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींच्या नावांमध्ये बदल का झाला? इतर संशयित आरोपींना अटक करण्याऐवजी त्यांना ‘परार’ का दाखविण्यात आले? मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात दिरंगाई का होत आहे? त्याला संरक्षण दिले जात आहे का? या सर्व बाबींची वरिष्ठ स्तरावर निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

पालिकेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

 

या प्रकरणात नगरपालिकेची भूमिका सर्वाधिक चर्चेत आली आहे. अधिकृत कत्तलखाना पालिकेच्या नियंत्रणाखाली असताना तेथील नोंदी, तपासणी, देखरेख आणि नियमांची अंमलबजावणी याबाबत पालिका प्रशासनाने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. गंभीर आरोप होत असतानाही अंतर्गत चौकशीची घोषणा न करणे आणि मौन बाळगणे यामुळे संशय अधिकच गडद होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.

 

कारवाई न झाल्यास करणार आंदोलन

 

प्रशासनाने तातडीने प्रभावी कारवाई केली नाही, दोषींना संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला किंवा चौकशीत दिरंगाई झाली तर जनआक्रोश मोर्चा, आमरण उपोषण आणि लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विश्व हिंदू परिषद – बजरंग दलाने दिला आहे. या निवेदनावेळी प्रखंड अध्यक्ष डॉ. संजय शाह, प्रखंड मंत्री सचिन चौधरी, प्रखंड संयोजक सचिन महाजन यांच्यासह विश्व हिंदू परिषद – बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि एक हजाराहून अधिक हिंदुत्वनिष्ठ नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *