‘जेसीबी का लावत नाही?’ या कारणावरून चौघांकडून शेतकऱ्याला काठ्यांनी मारहाण

अमळनेर (प्रतिनिधी )  तालुक्यातील एकलहरे येथे ‘जेसीबी का लावत नाही?’ या कारणावरून एका व्यक्तीला चौघांनी काठ्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना ११ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, एकलहरे येथील सुभाष निंबा वाडीले हे सुनील हरचंद पाटील यांच्या शेतातील सुरू असलेल्या कामासाठी जेसीबी आणण्याकरिता बांधावर गेले होते. त्यावेळी विक्रम दामू पाटील यांच्या गट क्रमांक ८१/०४ मधील बांधावर विक्रम दामू पाटील, भरत विक्रम पाटील, समाधान लखीचंद पाटील आणि चेतन निंबा पाटील (सर्व रा. एकलहरे) हे उभे होते.

यावेळी विक्रम पाटील यांनी “तू माझे जेसीबी का लावत नाही, तुला जास्त झाले आहे,” असे म्हणत वाद घातल्याचा आरोप आहे. त्यानंतर चौघांनी मिळून शेतातील काठ्यांनी सुभाष वाडीले यांना मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या उजव्या खांद्यावर, मांडीवर तसेच दोन्ही पायांवर मार लागून दुखापत झाली. तसेच चेतन पाटील यांनी चापट-बुक्क्यांनीही मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सुभाष निंबा वाडीले यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात विक्रम दामू पाटील, भरत विक्रम पाटील, समाधान लखीचंद पाटील आणि चेतन निंबा पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल मुकेश साळुंखे करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *