महापुराने ‘बेट’ बनलेल्या सात्री गावाचा संपर्क तुटला; प्रशासनाच्या दुर्लक्षाने नागरिकांची जगण्यासाठी धडपड

चार वर्षांपासून शोभेची ठरलेली आपत्कालीन बोट; पर्यायी रस्त्याचे कामही रखडले

अमळनेर (प्रतिनिधी) सात्री गावासाठी पावसाळा म्हणजे केवळ पावसाच्या सरी नव्हेत, तर दरवर्षी सुरू होणारी जगण्याची लढाईच ठरली आहे. बोरी नदीला पूर आला की गावाचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो आणि ग्रामस्थ अक्षरशः बेटावर अडकून पडतात. आजारी रुग्णांना उपचारासाठी बाहेर जाता येत नाही, विद्यार्थ्यांचा शाळा-महाविद्यालयाचा मार्ग बंद होतो, तर घरातील पीठ संपले तरी ते आणण्यासाठी जीव धोक्यात घालून नदी पार करण्याची वेळ नागरिकांवर येते. प्रशासनाने दिलेली आपत्कालीन बोट चार वर्षांपासून किनाऱ्यावरच धूळ खात पडली आहे; मात्र ग्रामस्थांच्या डोळ्यांतील मदतीची आस अजूनही संपलेली नाही. महापुराच्या पाण्यापेक्षा प्रशासनाच्या दुर्लक्षाची वेदना अधिक तीव्र झालेल्या सात्री गावाची ही कहाणी आहे.

अमळनेर तालुक्यातील सात्री गाव जणू शापितच झाले आहे. ३१ जुलै रोजी बोरी नदीला आलेल्या महापुरामुळे सात्री गावाचा सलग तीन दिवस संपर्क तुटला. दरवर्षी पावसाळा येतो, पूर येतो आणि गावाचा संपर्क तुटतो, हे प्रशासनाला माहीत असूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. परिणामी दळण दळण्यासाठीही नागरिकांना जीव धोक्यात घालून डांगरी येथे जावे लागत आहे. प्रशासनाने उपलब्ध करून दिलेली आपत्कालीन बोट चार वर्षांपासून प्रशिक्षणाअभावी शोभेची वस्तू बनली असून, यंदाच्या महापुरातही शासन आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सात्री गावाकडे फिरकले नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे गाव निम्न तापी प्रकल्प पाडळसेमध्ये बाधित असून, गावाचे पुनर्वसन अनेक वर्षांपासून रखडले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून गावाला पूल नसल्याने पावसाळ्यात गावकऱ्यांसाठी रस्ताच उपलब्ध राहत नाही. बोरी नदीला पूर आल्यानंतर गावाचा संपर्क पूर्णपणे तुटतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, रुग्णांची गैरसोय आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागविताना मोठ्या अडचणी निर्माण होतात.

 

चार जणांचा मृत्यू; तरीही कायमस्वरूपी उपाय नाही

 

सात्री गावाचा पावसाळ्यात संपर्क तुटण्याची समस्या नवीन नाही. या समस्येमुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात अनेकदा आंदोलनेही करण्यात आली. विविध पर्यायांवर चर्चा झाली. अखेरीस बंद पडलेल्या गिरणा पाटचारीच्या रस्त्यावरून पर्यायी रस्ता तयार करण्याचा पर्याय पुढे आला. मात्र हा पर्यायही अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही.

पुराच्या काळात नागरिकांचे हाल होऊ नयेत म्हणून प्रशासनाने गावाला आपत्कालीन बोट उपलब्ध करून दिली. बोट चालविण्यासाठी ग्रामस्थांना प्रशिक्षण देण्याचेही ठरले होते. मात्र तब्बल चार वर्षे उलटूनही कोणालाही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे लाखो रुपयांची ही बोट नागरिकांच्या मदतीला येण्याऐवजी शोभेची वस्तू ठरली आहे.

 

आजारी व्यक्ती चार दिवसांपासून अडकून

 

३१ जुलै रोजी आलेल्या महापुरामुळे सात्री गावाचा संपर्क पुन्हा तुटला. बाजारासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांपासून शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनाच याचा फटका बसला. भास्कर येलजी पाटील यांचे नुकतेच पोटाचे ऑपरेशन झाले आहे. त्यांना नळ्या टाकून संडास बायपास करावी लागते. दर दोन दिवसांनी ड्रेसिंग करण्यासाठी बाहेर जावे लागते. मात्र गावाचा संपर्क तुटल्याने ते चार दिवसांपासून गावातच अडकून पडले आहेत. शरीरातील जखमेतून निघणाऱ्या द्रवामुळे त्यांच्या पोटाच्या आजूबाजूची कातडी निघाल्याने त्यांची प्रकृती अधिकच त्रासदायक झाली आहे. गावातील काही नागरिकांच्या घरातील पीठ संपले होते, तर काहींना घरगुती वापराच्या अत्यावश्यक वस्तूंची गरज होती. त्यामुळे नाईलाजाने काही नागरिकांनी पिशव्या आणि इतर साहित्य डोक्यावर घेत जीव धोक्यात घालून नदी ओलांडली. प्राथमिक शिक्षकांनाही शाळेत जाणे शक्य झाले नाही.

 

वरिष्ठ अधिकारी दौऱ्यावर; मात्र सात्रीकडे पाठ

 

अमळनेर तालुक्यातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे, पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच जलसंपदा व आपत्ती मंत्री गिरीश महाजन यांनी दौरा केला. मात्र या दौऱ्यात सात्री गावाकडे कोणीही फिरकले नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. महापुरामुळे गावकऱ्यांचे जीवन विस्कळीत झाले असताना प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावाची प्रत्यक्ष पाहणी न केल्याने ग्रामस्थांच्या अडचणींकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

पाच किलोमीटर चिखल तुडवत अधिकारी गावात

दरम्यान, ग्रामसेवक श्यामराव धनगर आणि ग्राममहसूल अधिकारी परवर तडवी यांनी प्रशासकीय कामासाठी निंभोरा गावाकडून तब्बल पाच किलोमीटर चिखल तुडवत पायी सात्री गाव गाठले. ग्राममहसूल अधिकारी परवर तडवी यांनी गावाचा संपर्क तुटल्याची माहिती प्रशासनाला कळवली होती.

 

साडेतीन किलोमीटर रस्ता पूर्ण; उर्वरित काम रखडले

 

सात्री गावासाठी प्रस्तावित पर्यायी रस्त्यापैकी साडेतीन किलोमीटर रस्त्याचे काम झाले आहे. मात्र उर्वरित जागेची मोजणी, अतिक्रमण काढणे आणि रस्त्याला लाइन आऊट देण्याची कार्यवाही झालेली नसल्याने ठेकेदाराला पुढील काम करता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पर्यायी रस्त्याचा प्रश्न पुन्हा रखडला आहे.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संबंधित सर्व विभागांची बैठक घेऊन पावसाळ्यातील उपाययोजनांचे नियोजन केले जात होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या प्रक्रियेतही दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना बैठक घेण्याबाबत वारंवार कळवूनही कोणत्याही प्रकारची बैठक घेण्यात आलेली नसल्याचे माजी सरपंच महेंद्र बोरसे यांनी सांगितले.

 

तातडीने बैठक न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन

 

“साडे तीन किमी रस्ता झाला आहे. उर्वरित जागेची मोजणी करून अतिक्रमण काढलेले नाही ,लाइन आऊट दिलेली नाही म्हणून ठेकेदाराला काम करता येत नाही. पावसाळ्यापूर्वी जिल्हाधिकारीवकार्यालयामार्फत गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने सबंधित सर्व विभागांची बैठक घेऊन पावसाळ्यातील उपाययोजनांसदर्भात नियोजन केले जायचे मात्र जिल्हा पुनर्वसन अधिकारी व जिल्हा अधिकारी यांना बैठक लावण्यासंदर्भात वारंवार कळवून देखील कोणत्याही प्रकारची बैठक लावण्यात आलेली नाही. तातडीने बैठकीची उपाययोजना न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले जाईल.”

महेंद्र बोरसे, माजी सरपंच, सात्री, ता. अमळनेर

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *