अमळनेर मुख्य स्मशानभूमीचे शेड अपूर्ण; नागरिकांवर बाहेरच अंत्यसंस्कारची वेळ!

ठेकेदार-पालिकेत बिलावरून वाद

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील चोपडा रस्त्यावरील शनिपेठ येथील मुख्य स्मशानभूमीतील नवीन शेडचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांना नाईलाजास्तव बाहेर खालच्या बाजूला अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. त्यामुळे मृतदेहाची विटंबना होत असल्याची तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे काम पूर्ण करण्यासाठी बिल अदा न झाल्याची तक्रार संबंधित ठेकेदाराने केली आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणीही योग्य जागा मिळत नसल्याने मृतदेहाची हेटाळणी होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून शेडचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर नगरपरिषदेला स्मशानभूमीसाठी नवीन शेड उभारण्याकरिता सुमारे एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या कामाचा ठेका ठेकेदार मिहीर हेमंत पवार यांना देण्यात आला आहे. ठेकेदाराने सुमारे ९० टक्के काम पूर्ण केले असले तरी उर्वरित काम बाकी असल्याने शेडचा पूर्ण वापर सुरू होऊ शकलेला नाही. अमळनेर शहर मोठे असल्याने सुमारे ८० टक्के अंत्यसंस्कार चोपडा रस्त्यावरील शनीपेठ स्मशानभूमीतच केले जातात. मात्र विद्यमान शेड अपुरे पडत असल्याने अनेकांना आपल्या नातेवाईकांचे अंत्यसंस्कार स्मशानभूमीच्या खालच्या बाजूस किंवा इतरत्र करावे लागत आहेत.

दरम्यान, ठेकेदार मिहीर पवार यांनी सांगितले की, “सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. झालेल्या कामाचा मोबदला टप्प्याटप्प्याने मिळाला तर उर्वरित काम तातडीने पूर्ण करता येईल. जिल्हा नियोजन विभागाने या कामासाठी १ जानेवारी रोजीच चेक क्रमांक ८६९५८ द्वारे ४९ लाख ९५ हजार रुपयांचा निधी नगरपालिकेला दिला आहे. मात्र अद्यापपर्यंत बिल अदा करण्यात आलेले नाही. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी बिल देण्यात यावे,” अशी मागणी करणारे पत्रही पालिकेला दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

ठेकेदाराला काम पूर्ण करण्याचे आदेश

 

कामाचे ऑडिट बाकी आहे. निधी प्राप्त झाला असला तरी ऑडिट झाल्यानंतर बिल अदा केले जाईल. ठेकेदाराला काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गणेश शिंदे , मुख्याधिकारी अमळनेर  नगरपरिषद 

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *