
राजपूत एकता मंचतर्फे नगरसेवकांसह एमपीएससीत यशस्वी भगिनींचा गौरव
अमळनेर (प्रतिनिधी) येथील राजपूत एकता मंचतर्फे अमळनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांसह महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करून युवकांना प्रेरणा देण्याचा उद्देश या कार्यक्रमातून साध्य करण्यात आला.
हाशिमजी प्रेमजी संकुलातील प्रफुल्ल कॉमर्स अकॅडमी येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. धर्मसिंह पाटील होते. यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका कविता विजयसिंह राजपूत, कल्पना भरतसिंग परदेशी व स्वाती सूरजसिंह परदेशी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अमळनेर तालुक्यातील खडके येथील प्रांजल वसंत पाटील (कृषी उपसंचालक पदावर निवड) आणि मानसी वसंत पाटील (मंडळ कृषी अधिकारी पदावर नियुक्ती) या दोन्ही भगिनींचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी दोन्ही भगिनींनी मनोगत व्यक्त करत या सन्मानामुळे आपले मनोबल अधिक वाढल्याची भावना व्यक्त केली. त्यांच्या वडिलांनी, वन विभागात आरएफओ पदावर कार्यरत असलेले वसंत पाटील यांनीही समाजबांधवांनी केलेल्या या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी पालिका निवडणुकीत चांगली लढत देऊन अल्प मतांनी पराभूत झालेले चेतन राजपूत व रणजित पाटील यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वर्णदीप राजपूत यांनी केले, तर आभार अनिल पाटील यांनी मानले. या सोहळ्यास राजपूत एकता मंचचे अध्यक्ष रणजित पाटील तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply