
१३ महिला बचत गटांना प्रत्येकी १० हजारांचे खेळते भांडवल; विहीर दुरुस्तीचे कार्यारंभ आदेश वितरित
अमळनेर (प्रतिनिधी) क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचा शुभारंभ १३ नोव्हेंबर रोजी पंचायत समितीच्या साने गुरुजी सभागृहात झाला. यावेळी तालुक्यातील १३ महिला स्वयंसहायता बचत गटांना राणी दुर्गावती योजनेंतर्गत प्रत्येकी १० हजार रुपयांचे खेळते भांडवल वितरित करण्यात आले. तसेच बिरसा मुंडा विहीर दुरुस्ती योजनेंतर्गत लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाला खासदार स्मिता वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील, संगीता भिल, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, भाजप मंडळ अध्यक्ष जिजाबराव पाटील व राहुल पाटील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे तालुका समन्वयक एन. एस. खंबायत उपस्थित होते. यांच्यासह अविनाश अहिरे, रजनीकांत भांबरे, जाकीर शेख, विवेक पाटील आणि मदन पाटील यांची उपस्थिती होती.
यावेळी आदिवासी समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. महिला बचत गटांना मिळालेल्या खेळत्या भांडवलामुळे त्यांच्या स्वयंरोजगाराला चालना मिळणार असून, विहीर दुरुस्ती योजनेमुळे लाभार्थ्यांना सिंचन सुविधांमध्ये सुधारणा करता येणार आहे. जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेला लढा आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यावर या सप्ताहात भर दिला जाणार असल्याचे खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उमेद अभियानाच्या तालुका अभियान व्यवस्थापक सीमा पाटील, किशोर पवार, योगेश भामरे आणि जितेंद्र भोई यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply