सहा अरुंद पूल, जानवे-मंगरूळचे धोकादायक दुभाजक ठरताहेत अपघातांना निमंत्रण

एकाच महामार्गावर दोन निकष! धुळे हद्दीत सुविधा, अमळनेर तालुका मात्र वंचित

अमळनेर (प्रतिनिधी) धुळे ते अमळनेर राज्य महामार्ग क्रमांक १५ वर एकाच प्रकल्पांतर्गत धुळे हद्दीत काँक्रीट रस्ते, गटारी आणि एसटी पिकअप शेडची सुविधा उभारली जात असताना अमळनेर तालुक्याच्या वाट्याला मात्र या मूलभूत सुविधांचा अभाव आल्याचा गंभीर आरोप होत आहे. हायब्रीड ॲन्युइटी मॉडेल (एचएएम ) अंतर्गत झालेल्या या प्रकल्पात दोन वेगवेगळे निकष लावण्यात आल्याने अमळनेर तालुक्याशी दुजाभाव का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. त्यातच सहा अरुंद पूल, तुटलेले कठडे आणि जानवे-मंगरूळ येथील धोकादायक दुभाजकांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

धुळे ते अमळनेर महामार्गावरील डांबरी रस्त्यांवर खड्डे पडल्यास कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याऐवजी खडी, वाळू आणि सिमेंटचे काँक्रीट टाकून खड्डे बुजविले जात असल्याची तक्रार आहे. ही पद्धत तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे का, वापरण्यात येणाऱ्या साहित्याची गुणवत्ता काय आहे आणि अशा दुरुस्तीला विभागाची मंजुरी आहे का, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.

संपूर्ण मार्गावर सुमारे सहा पूल अरुंद व धोकादायक असून अनेक ठिकाणी पुलांचे कठडे तुटलेले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी अरुंद पूल वाहनचालकांच्या लक्षात येण्यासाठी आवश्यक रिफ्लेक्टर आणि धोकादर्शक फलक नसल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. जानवे आणि मंगरूळ गावातील दुभाजकांची परिस्थितीही चिंताजनक आहे. या दुभाजकांवर वाहने आदळून अपघात होत असल्याच्या तक्रारी असून रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टर किंवा अन्य सुरक्षा व्यवस्था नसल्याने ते वाहनचालकांना दिसत नाहीत. त्यामुळे हे दुभाजक काढून टाकावेत किंवा त्यावर तातडीने आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. महामार्गावर प्रकल्पाची मंजूर किंमत, कंत्राटदाराचे नाव, प्रकल्पाचा कालावधी, देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी आणि संबंधित अधिकाऱ्यांची माहिती देणारे प्रकल्प माहिती फलकही दिसत नाहीत. अनेक ठिकाणी सूचनाफलक, किलोमीटरच्या खुणा, धोकादायक वळणांवरील बॅरिकेड्स, पांढरे-पिवळे मार्गदर्शक पट्टे आणि रात्री वाहनचालकांना दिशा दाखविणारे रिफ्लेक्टर नसल्याचे चित्र आहे. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी रुग्णवाहिका, प्रकल्प अधिकारी आणि संबंधित पोलीस ठाण्याचे दूरध्वनी क्रमांक दर्शविणारे फलकही उपलब्ध नाहीत. लांब पल्ल्याच्या या मार्गावर स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिकांसह अन्य प्रवाशांची गैरसोय होत आहे. अमळनेर तालुक्यातील गावांसाठी नेमकी कोणती कामे मंजूर होती, मंजूर आराखड्यात काँक्रीटीकरण, गटारी आणि एसटी पिकअप शेडची तरतूद होती का, त्यासाठी किती निधी मंजूर झाला आणि प्रत्यक्षात किती कामे झाली, याची गावनिहाय माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. प्रकल्पाचा सर्वेक्षण अहवाल, मंजूर आराखडा, प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, निविदा, करारातील अटी आणि प्रत्यक्ष झालेल्या कामांची तुलना करून तांत्रिक व प्रशासकीय चौकशी करण्याचीही मागणी जोर धरत आहे.

सहा अरुंद पुलांचे कठडे दुरुस्त करणे, रिफ्लेक्टर व धोकादर्शक फलक बसविणे, किलोमीटरच्या खुणा आणि मार्गदर्शक पट्टे तयार करणे, जानवे व मंगरूळ येथील धोकादायक दुभाजकांवर उपाययोजना करणे, वळणांवर बॅरिकेड्स उभारणे आणि आपत्कालीन संपर्क क्रमांकांचे फलक लावणे आवश्यक आहे. याशिवाय प्रलंबित रस्ते, गटारी आणि प्रवासी सुविधांची कामेही पूर्ण करावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एकाच महामार्गाचा, एकाच एचएएम प्रकल्पाचा आणि सार्वजनिक निधीचा वापर होत असताना धुळे हद्दीत सुविधा आणि अमळनेर तालुक्यात मात्र त्यांचा अभाव का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कामात तफावत, निष्काळजीपणा किंवा करारातील अटींचे उल्लंघन आढळल्यास संबंधित कंत्राटदारासह जबाबदार अधिकारी व अभियंत्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

 

धोकादायक दुभाजकांमुळे अपघात

 

धुळे ते अमळनेर महामार्गावरील परिस्थिती पाहता नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अरुंद पुलांना योग्य सुरक्षा व्यवस्था नाही, अनेक ठिकाणी रिफ्लेक्टर व सूचनाफलक नाहीत. गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण, गटारी आणि एसटी पिकअप शेडची सुविधा नाही. जानवे व मंगरूळ येथील धोकादायक दुभाजकांवर वाहने आदळून अपघात होत असून रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टर नसल्याने हे दुभाजक दिसत नाहीत. त्यामुळे ते काढून टाकावेत किंवा आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात. एकाच प्रकल्पात धुळे हद्दीत चांगल्या सुविधा आणि अमळनेर तालुक्यात त्याचा अभाव असेल, तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे.

-शरद पाटील, ग्रामस्थ, जानवे (अमळनेर)

 

तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी करून त्रुटींची दुरुस्ती करू

 

धुळे ते अमळनेर राज्य महामार्ग क्र. १५ हा हायब्रीड ॲन्युइटी मॉडेल अंतर्गत असल्याने त्याची कामे व देखभाल करारातील अटींनुसार करण्यात येते. अरुंद पूल, सुरक्षा व्यवस्था, गटारी, मार्गदर्शक पट्टे, रिफ्लेक्टर, सूचनाफलक तसेच गावांमधील सुविधांबाबत करण्यात आलेल्या तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासण्यात येईल. मंजूर प्रकल्प आराखड्यानुसार कोणती कामे प्रस्तावित होती आणि प्रत्यक्षात कोणती कामे झाली आहेत, याचीही पडताळणी केली जाईल. त्रुटी आढळल्यास संबंधित कंत्राटदाराकडून करारातील तरतुदींनुसार आवश्यक दुरुस्तीची कामे करून घेण्यात येतील.

आर. आर. पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे 

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *