
गॅस दरवाढीच्या निषेधार्थ अमळनेरमध्ये काँग्रेसचे आंदोलन; विटांच्या चुलीवर गुळाचा चहा बनवून सरकारचा निषेध
अमळनेर (प्रतिनिधी) गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींच्या निषेधार्थ अमळनेर तालुका काँग्रेस समितीतर्फे शुक्रवार दि. १३ मार्च रोजी सकाळी तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यात आले. तीन विटांच्या चुलीवर गुळाचा चहा बनवून केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच गॅसच्या वाढीव किमती तात्काळ कमी कराव्यात, या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, युद्धजन्य परिस्थितीत लोकांच्या मानसिकतेचा फायदा घेत भारतीय जनता पक्षाच्या सरकारने गॅस दरवाढ केली आहे. आधीच महागाईने नागरिक त्रस्त असताना केंद्र सरकारने अचानक घरगुती वापराच्या तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती वाढवल्या आहेत. मोदी सरकारच्या कार्यकाळात आतापर्यंत जवळपास ५० वेळा गॅस सिलेंडरच्या किमती वाढविण्यात आल्या असल्याचा आरोपही करण्यात आला.
जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असतानाही गॅसच्या किमती कमी करण्यात आल्या नाहीत. उलट सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेत गॅस सिलेंडरच्या किमती वाढविण्यात आल्या असून हा नफेखोरीचा प्रकार असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
सध्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ७२० रुपयांवरून ८६० रुपये करण्यात आली असून प्रति सिलेंडर ६० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १८१० रुपयांवरून १९२४ रुपये करण्यात आली असून प्रति सिलेंडर ११४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच घरगुती गॅस सिलेंडरचा नोंदणी कालावधी ग्रामीण भागात ४५ दिवस तर शहरी भागात २५ दिवस करण्यात आल्याने नागरिकांचा विश्वासघात झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कुटुंबीय अंदाजपत्रक कोलमडले असून महिला, सर्वसामान्य जनता तसेच हॉटेल व्यवसायिकांना मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचेही काँग्रेसने नमूद केले. काँग्रेसच्या कार्यकाळात गॅस सिलेंडर सुमारे ४०० रुपयांना मिळत होता, तर सध्या त्याची किंमत जवळपास ९०० रुपयांपर्यंत पोहोचली असल्याचा उल्लेख करत “हेच का भाजप सरकारचे अच्छे दिवस?” असा सवालही करण्यात आला.
गॅस सिलेंडरच्या वाढीव किमती तात्काळ कमी करून नागरिकांना पूर्वीच्या दराने गॅस पुरवठा करावा, अशी मागणी काँग्रेसने निवेदनाद्वारे केली आहे. या आंदोलनात काँग्रेस तालुका अध्यक्ष भागवत केशव सूर्यवंशी, लोटन चौधरी, सुलोचना वाघ, मगन वामन पाटील, मनोज पाटील, संदीप घोरपडे, गजेंद्र साळुंखे, ॲड. तिलोतमा पाटील, कैलास प्रल्हाद पाटील, ॲड. क्रांती ठाकरे, ॲड. चारू शिंदे, के. व्ही. पाटील, डी. झेड. महाजन, पार्थराज पाटील, बन्सीलाल भागवत, ए. डी. पाटील, भगवान संधान शिव, तोसीब तेली, डॉ. रवींद्र पाटील, अनिल पाटील, नगराज पाटील, रामकृष्ण नामदेव पाटील, एस. सी. तेले, रोहिदास कापडे, दिलीप साहेबराव पाटील, राजेंद्र पौला चौधरी, डॉ. प्रकाश सोनवणे, पी. वाय. पाटील, राजू भाट, पितांबर पाटील, भिकाजी पाटील, मनोहर पाटील, मधुकर पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply