
ओव्हर लोडेड रेती, खडीचे डंपरमुळे पिंपळे रोडवरील महात्मा फुले कॉलनीचा पूल खचला
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील पिंपळे रोड परिसरात महात्मा फुले कॉलनीकडे जाणारा पिंपळे नाल्यावरचा पूल (ढापा) अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे खचल्याची घटना समोर आली आहे. या पुलाला तडे जाऊन तो धोकादायक झाल्याने कॉलनीतील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ढेकू रस्ता बंद असल्यामुळे त्या मार्गावरील सर्व अवजड वाहतूक पिंपळे रोडकडे वळवण्यात आली आहे. परिणामी, काँक्रीट रस्ता संपल्यानंतरचा पुढील भाग पूर्णपणे खड्डेमय झाला असून वाहनचालकांसह नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावरून ओव्हरलोडेड रेतीचे डंपर, खडी वाहने, धान्याने भरलेले ट्रक तसेच एस.टी. बससुद्धा वेगाने धावत असल्याचे चित्र दिसत आहे. या वाढत्या अवजड वाहतुकीचा फटका पिंपळे रोडवरील महात्मा फुले कॉलनी तसेच वामन नगर परिसरातील पुलांनाही बसला आहे. महात्मा फुले कॉलनीचा पूल आधीच कमकुवत अवस्थेत असताना त्यावरून सतत अवजड वाहने गेल्याने तो अधिकच ढासळला आहे. तर वामन नगरला जोडणाऱ्या पुलाच्या काँक्रीट भिंतीलाही मोठे नुकसान होऊन ती सरकण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
या सर्व प्रकाराकडे महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि नगर परिषद यांचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. ओव्हरलोडेड रेती वाहतूक रोखण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने रस्ते व पूल यांची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली असून, ओव्हरलोडेड वाहनांवर कठोर कारवाई करावी, महात्मा फुले कॉलनीतील तुटलेला पूल त्वरित दुरुस्त करावा किंवा नव्याने उभारावा, तसेच वामन नगर पुलाच्या बेसची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे. तसेच ढेकू रोडच्या ठेकेदारामार्फत पिंपळे रोडचीही दुरुस्ती करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कॉलनीतील रहिवाशांनी लवकरच नगर परिषदेकडे निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र निवेदनाची वाट न पाहता प्रशासनाने नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा विचार करून तातडीने उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Leave a Reply