पिंपळे खुर्द परिसरात डिझेल टंचाई; शेतीकामे ठप्प, शेतकऱ्यांचा संताप

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे खुर्द परिसरात डिझेलच्या तीव्र तुटवड्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली असून, शेतीची महत्त्वाची कामे ठप्प झाली आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मशागत, नांगरणी आणि पेरणीपूर्व तयारी सुरू असतानाच डिझेल टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळपासून शेतकरी डिझेल मिळवण्यासाठी चार-चार तास रांगेत उभे राहत आहेत. मात्र, स्थानिक पेट्रोल पंपांवरून डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. परिणामी, ट्रॅक्टर, पंपसेट यांसारखी शेतीसाठी आवश्यक साधने ठप्प पडली असून शेतकऱ्यांना कामे अर्धवट सोडावी लागत आहेत.

डिझेलसाठी शेतकऱ्यांना १२ ते १५ किलोमीटर अंतरावरील अमळनेर शहरात जावे लागत आहे. मात्र, तेथेही पुरवठा मर्यादित असल्याने शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक व वेळेचा ताण पडत आहे. या परिस्थितीमुळे खरीप हंगामातील पेरणी उशिरा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

युवराज पाटील या शेतकऱ्याने संताप व्यक्त करत सांगितले की, “आम्ही सकाळपासून रांगेत उभे आहोत. डिझेलशिवाय ट्रॅक्टर, पंपसेट काहीच चालत नाही. पेरणीचे दिवस आले आहेत, पण अधिकारी लक्ष देत नाहीत आणि पेट्रोल पंप मालक डिझेल देत नाहीत. अशा परिस्थितीत शेती करायची तरी कशी?”, शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली असून, डिझेलचा पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अन्यथा खरीप हंगामात मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *