
साखरपुड्याचे थेट निकाहमध्ये रूपांतर; अमळनेरात ठरला अनोखा आणि चर्चेचा विवाह सोहळा
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील खाटीक समाजात एक आगळावेगळा आणि लक्षवेधी प्रसंग घडला असून, साखरपुड्याचा कार्यक्रम थेट निकाह (विवाह) सोहळ्यात रूपांतरित करण्यात आल्याने हा विवाह सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर येथील शकील सलीम खाटीक यांची कन्या गुलअफशा बी हिचा साखरपुडा मालेगाव येथील अल्ताफ अहमद शेख बशीर खाटीक यांचा मुलगा हमजाह याच्यासोबत ठरला होता. यानिमित्ताने दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी अमळनेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी दोन्ही कुटुंबीय, नातेवाईक तसेच खाटीक समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असतानाच समाज पंच मंडळी, दोन्ही कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर सर्वांच्या परस्पर संमतीने साखरपुड्याचा कार्यक्रम थेट निकाह सोहळ्यात रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्णयानंतर तत्काळ निकाहची विधी पार पडली. या अनपेक्षित पण आनंददायी घडामोडीमुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. एकाच दिवशी साखरपुडा आणि विवाह सोहळा पार पडल्याने वेळ, खर्च आणि परंपरेचा समन्वय साधणारा हा उपक्रम म्हणून या विवाहाकडे पाहिले जात आहे. अशा प्रकारे अचानक घेतलेल्या निर्णयामुळे हा अनोखा निकाह सोहळा शहरात चर्चेचा विषय ठरला असून, सामाजिक एकोपा आणि परस्पर समजुतीचे उदाहरण म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे.

Leave a Reply