
अमळनेर शेतकरी सहकारी संघाची अखेर निवडणूक जाहीर; १५ जागांसाठी रंगणार राजकीय रणसंग्राम
२७ एप्रिल ते ४ मे या कालावधीत नामनिर्देशन अर्ज विक्री व दाखलची मुदत

अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या काही वर्षांपासून अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघावर प्रशासक राज असताना मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे.
जाहीर कार्यक्रमानुसार २७ एप्रिल ते ४ मे या कालावधीत नामनिर्देशन अर्ज विक्री व दाखल करण्याची मुदत राहणार आहे. ५ मे रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार असून ६ मे रोजी नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर २१ मे रोजी चिन्ह वाटप व अंतिम विधीग्राह्य उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. आवश्यकता भासल्यास ३० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून ३१ मे रोजी मतमोजणी होऊन तत्काळ निकाल जाहीर केला जाणार आहे.
या निवडणुकीत एकूण १५ जागांसाठी मतदान होणार असून त्यामध्ये व्यक्तिशः ५, सोसायटी ५, महिला राखीव २, इमाव २, अनुसूचित जाती-जमाती १ तसेच विजाभज व विमाप्र १ अशा जागांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी धर्मराज पाटील (सहायक निबंधक, अमळनेर) यांच्या नियंत्रणाखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, निवडणूक जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांनी आपापल्या स्तरावर रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. इच्छुक उमेदवारांनी पक्षांकडे लॉबिंग सुरू केले असून काहींकडून निवडणूक बिनविरोध करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. अनेक वर्षांनंतर ही निवडणूक होत असल्याने आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लांबल्यामुळे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. आमदार अनिल पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाकार घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त होत असून त्यामुळे संघावरील आर्थिक भारही कमी होऊ शकतो.

Leave a Reply