
मंगळग्रह मंदिरात सोमवारी भक्तीचा महासोहळा; श्री मंगळ जन्मोत्सवाची जय्यत तयारी
अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही परम पवित्र श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होणार आहे. मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे आयोजित या सोहळ्यानिमित्त पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तिमय, चैतन्यमय आणि मंगलमय वातावरण राहणार आहे.
मंदिराच्या इतिहासात हा दिवस सर्वांत मोठा आणि परम पवित्र मानला जात असल्याने भाविकांमध्ये या सोहळ्याबाबत उत्साहाचे वातावरण आहे. पहाटे ४ वाजता श्री मंगळग्रह देवांच्या मूर्तीवर वैशिष्ट्यपूर्ण पंचामृत अभिषेकाने सोहळ्याला सुरुवात होईल. सकाळी ६ वाजता फुलांनी सजवलेल्या पाळण्यात श्री मंगळग्रह देवांचा प्रतिकात्मक जन्मोत्सव साजरा करण्यात येईल. सकाळी ७ वाजता मंदिरावरील जुने ध्वज विधीवत उतरवून नवीन ध्वज लावण्यात येतील. त्यानंतर श्री मंगळग्रह देवांची महाआरती होऊन ५६ भोगांचा महाप्रसाद अर्पण करण्यात येईल. दुपारी १ वाजता रेती, शेती आणि मातीशी निगडित असलेल्या समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी श्री महाभोमयागाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता श्री मंगळग्रह देवांची मंदिर परिसरातून वाद्यवृंदासह वाजतगाजत पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून, सायंकाळी ६ वाजता श्री मंगळग्रह देवांची महाधुपारती होईल. श्री मंगळ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सर्व भाविकांनी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री मंगळग्रह देवांचे दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेचे समस्त विश्वस्त मंडळ व सेवेकऱ्यांनी केले आहे.
खान्देशच्या भूमीचे वैभव असलेले श्री मंगळग्रह मंदिर
येथील श्री मंगळग्रह मंदिर हे खान्देशची भूमी गौरवान्वित करणारे असून महाराष्ट्रासह देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे श्री मंगळग्रह देवांची विश्वातील एकमात्र स्वयंभू मूर्ती असल्याचे मानले जाते. या मूर्तीशेजारी भूमीमातेची दाक्षिणात्य शैलीतील एकमेव मूर्ती तसेच पंचमुखी हनुमानजींची मूर्ती आहे. मंदिर परिसरात भगवान श्री गुरुदत्त-माता श्री अनघालक्ष्मी यांच्या मूर्ती असलेले कमंडलूस्थित आणि भगवान श्री कालभैरव-माता भैरवी यांचे त्रिशूलात्मकस्थित विश्वातील एकमात्र मंदिर असल्याचेही सांगितले जाते.

Leave a Reply