बाजार समितीत वजन काट्यावर मोजलेल्या मालाची माहिती आता थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर

अमळनेर (प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेरच्या वतीने वजन काट्यावर मोजण्यात येणाऱ्या शेतमालाची माहिती थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर संदेशाद्वारे मिळण्याची प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीचे उद्घाटन बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

बाजार समितीत शेतकरी विविध प्रकारचा शेतमाल विक्रीसाठी आणतात. रोखीने पेमेंट मिळत असल्याने बाजार समितीवर विश्वास ठेवून अमळनेर तालुक्यासह बाहेरगावचे अनेक शेतकरी येथे माल विक्रीसाठी आणतात. शेतकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देतानाच व्यवहारात अधिक पारदर्शकता यावी, या उद्देशाने बाजार समितीने ही नवीन सुविधा सुरू केली आहे.

या प्रणालीद्वारे बाजार समितीत येणाऱ्या आणि वजन काट्यावर मालाची मोजणी करणाऱ्या प्रत्येक वाहनाचा क्रमांक तसेच मोजण्यात आलेल्या मालाचे वजन शेतकऱ्याने दिलेल्या किंवा बाजार समितीत नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेशाद्वारे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आपला माल किती वजनाचा होता, याची माहिती घरबसल्या मिळणार आहे. शेतकऱ्याने आपला माल दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा वाहनचालकाकडे विक्रीसाठी पाठविला असला, तरी वजनाची अधिकृत नोंद मोबाईलवर उपलब्ध होणार असल्याने व्यवहारातील पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. तसेच कोणत्या वाहनातून, केव्हा आणि किती माल बाजार समितीत आणला गेला, याची नोंदही अद्ययावत राहणार आहे.

शेतकऱ्यांचा बाजार समितीवरील विश्वास अधिक दृढ व्हावा आणि शेतमालाच्या व्यवहारात गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी बाजार समितीच्या वतीने नवनवीन सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या वेळी सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील, सचिव डॉ. उन्मेष राठोड, शरद पाटील तसेच बाजार समितीचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *