जिल्हास्तरीय टेबल टेनिसमध्ये पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलींची सुवर्ण कामगिरी

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव येथील अनुभूती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने दैदिप्यमान कामगिरी करत जिल्हास्तरीय विजेतेपद पटकावले. या शानदार कामगिरीमुळे संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील विविध नामांकित शाळांच्या संघांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक वातावरणात झालेल्या स्पर्धेत पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलींनी तीन ते चार पात्रता फेरीतील सामने खेळत नामांकित संघांना पराभूत केले. उपांत्यपूर्व सामन्यात रुस्तम इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघावर मात केल्यानंतर अंतिम सामन्यात अनुभूती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाला पराभूत करत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचे विजेतेपद मिळविले. या विजयी संघात अक्षरा जे. पाटील, विनिता डी. कोळी, हर्षिता जे. वाधवानी, हिताक्षी ए. पाटील आणि ग्रंथी के. पटेल यांचा समावेश आहे. सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या विद्यार्थिनींना क्रीडा शिक्षक रोहन मुंदडा, महेश माळी आणि विनायक सूर्यवंशी यांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षकेतर कर्मचारी मंगलबाई पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाले. विजयी विद्यार्थिनींचे शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, प्रशांत वंजारी, अश्विन चौधरी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी अभिनंदन करून कौतुक केले. विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या संघाला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *