
अमळनेर शहरात ४०० ते ५०० अनधिकृत बॅनर; वाहनचालकांसह नागरिकांच्या जीवाला धोका!
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील मुख्य रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे आणि विद्युत खांबांवर लावण्यात आलेल्या ४०० ते ५०० अनधिकृत बॅनर, जाहिरात फलक व होर्डिंगमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. हे बॅनर तातडीने हटवून संबंधित व्यक्ती, संस्था व जाहिरातदारांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जितेंद्र अनिल संदानशीव (रा. फरशी रोड, अमळनेर) यांनी पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात नगरपरिषद प्रशासनालाही निवेदन देण्यात आले आहे.
संदानशीव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर नगरपरिषद हद्दीतील विविध मुख्य रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे तसेच विद्युत खांबांवर मोठ्या प्रमाणात बॅनर, जाहिरात फलक व होर्डिंग लावण्यात आले आहेत. यापैकी काही बॅनर मुख्य रस्त्यांवरील विद्युत खांबांवर आणि पोलिसांच्या चौकातही लावण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील सार्वजनिक जागांचा वापर अनधिकृतपणे होत असून वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बॅनरमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच जोरदार वाऱ्यामुळे बॅनर किंवा त्यांचे लोखंडी सांगाडे कोसळल्यास वाहनचालक, पादचारी आणि नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. सार्वजनिक रस्ते व विहित जागांवर अशा प्रकारे अनधिकृत बॅनर लावणे सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
महाराष्ट्र शासनाचे निर्देश तसेच प्रतिज्ञापत्र अधिनियम, १९९९ मधील कलम ३ व ४ अन्वये सक्षम प्राधिकाऱ्याची लेखी परवानगी नसताना सार्वजनिक ठिकाणी जाहिरात किंवा बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २८५ अन्वये सार्वजनिक मार्गावर धोका किंवा अडथळा निर्माण करणाऱ्यांवर आणि कलम १२६ अन्वये नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
नगरपरिषदेलाही दिले निवेदन
महाराष्ट्र मालमत्तेचे विद्रुपीकरण प्रतिबंधक अधिनियम, १९९५ च्या कलम ३ सह कलम ४ अन्वयेही गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरातील विद्युत खांबांवर लावलेले सर्व अनधिकृत बॅनर तातडीने हटवावेत. बॅनर लावणाऱ्या संबंधित व्यक्ती, संस्था, मंडळे, जाहिरातदार तसेच जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जितेंद्र अनिल संदानशीव यांनी केली आहे. सदर प्रकरण नागरिकांच्या जीविताशी व सार्वजनिक सुरक्षिततेशी संबंधित असल्याने प्रशासनाने दुर्लक्ष न करता तातडीने दखल घ्यावी. तपासात गुन्हा निष्पन्न झाल्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १७३ अन्वये प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Leave a Reply