मोटरसायकल अपघातात गंभीर जखमी योगेश पाटील यांचा मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) मोटरसायकल घसरून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ब्रेन डेड झालेल्या पाचोरा तालुक्यातील योगेश शिवाजी पाटील (वय ४०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना २ रोजी दुपारी साडेचार वाजता घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील कृष्णापुरी येथील योगेश शिवाजी पाटील हे २८ रोजी आपल्या मुलांसह अमळनेर तालुक्यातील सडावण येथून जात असताना त्यांची मोटरसायकल घसरली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना तातडीने पारोळा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तेथून मित्र व नातेवाईकांनी त्यांना पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने तेथील डॉक्टरांनी त्यांना न्यूरोसर्जनकडे नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर २९ रोजी त्यांना डॉ. राजेश जैन यांच्याकडे नेण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांचा मेंदू ब्रेन डेड झाल्याचे सांगून पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल, जळगाव येथे नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, २ रोजी दुपारी साडेचार वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांचे चुलत भाऊ मिलिंद आत्माराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल लक्ष्मीकांत शिंपी करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *