
नीट पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करा; एनएसयूआय आणि काँग्रेसचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) : नीट परीक्षा पेपरफुटी आणि घोटाळा प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करून संपूर्ण प्रकरणाची सखोल व पारदर्शक चौकशी करावी, या मागणीसाठी एनएसयूआय (विद्यार्थी काँग्रेस) आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रांताधिकारी, अमळनेर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी दोषींना पाठीशी घालण्याचे प्रकार थांबवून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, देशभरात नीट परीक्षा घोटाळा आणि पेपरफुटी प्रकरणाविरोधात काँग्रेस पक्ष, एनएसयूआय आणि युवक काँग्रेसच्या वतीने विविध आंदोलन करण्यात आली आहेत. लाखो विद्यार्थी दिवस-रात्र मेहनत करून डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहत असताना पेपरफुटी आणि गैरप्रकारांमुळे त्यांच्या कष्टांवर पाणी फिरत असल्याचा आरोप करण्यात आला.
या प्रकरणात पेपरफुटीत सहभागी व्यक्ती, त्यांना सहकार्य करणारे घटक, पेपर खरेदी करणारे विद्यार्थी व पालक तसेच परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या संपूर्ण साखळीची सखोल चौकशी का करण्यात आली नाही, असा सवाल निवेदनातून उपस्थित करण्यात आला. अनेक विद्यार्थी या घोटाळ्यामुळे मानसिक तणावाला सामोरे गेले असून अजूनही अनेक दोषी मुक्तपणे वावरत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी जळगाव जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस मनोज पाटील, जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे, अमळनेर काँग्रेस तालुकाध्यक्ष भागवत सूर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेश पाटील, युवक काँग्रेस प्रदेश सचिव तुषार संदानशिव, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष ॲड. कौस्तुभ पाटील, एनएसयूआय तालुकाध्यक्ष उमेश संदानशिव, प्रविण पाटील, भगवान संदानशिव, पप्पू भिल, कुणाल कोळी, विनायक सोनवणे, निलेश भिल, अशोक पाटील, कृष्णा चौधरी, करण भिल, निंबाजी भिल, प्रताप पाटील, रोहिदास पाटील, श्रीराम पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशा आहेत प्रमुख मागण्या
निवेदनाद्वारे नीट पेपरफुटी प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, पेपरफुटीमागील संपूर्ण यंत्रणेची सखोल चौकशी करावी, दोषींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी, संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक आणि वेळबद्ध चौकशी करावी, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पाठीशी घालू नये तसेच दिल्ली येथील जंतरमंतर आणि देशातील इतर ठिकाणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाईचे आदेश देणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. सरकारने या प्रकरणात तातडीने ठोस भूमिका न घेतल्यास काँग्रेस पक्ष, एनएसयूआय आणि युवक काँग्रेसच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.

Leave a Reply